पायाखोदाईवेळी महादेव गल्लीत दुर्घटना : दोघेजण जखमी
प्रतिनिधी / बेळगाव
नव्या बांधकामासाठी पायाखोदाई सुरू असताना शेजारच्या घराची मातीची भिंत कोसळून ढिगाऱयाखाली सापडून वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी महादेव गल्ली (हॉटेल वृंदावनशेजारी) परिसरात ही दुर्घटना घडली आहे. मातीच्या ढिगाऱयाखाली अडकलेल्या दोघा जणांना वाचविण्यात आले आहे.
शहरातील बहुतेक पोलीस अधिकारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या बेळगाव दौऱयाच्या बंदोबस्तात असताना ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिक, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱयाखाली सापडलेल्या कामगारांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले.
कल्लाप्पा कऱयाप्पा होसमनी (वय 62, मूळचे रा. निरलकट्टी-धारवाड, सध्या रा. मंडोळी रोड, पापामळा, बेळगाव) असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. कल्लाप्पा आपला मेहुणा व मुलांसमवेत पायाखोदाईच्या कामात असताना शेजारच्या घराची मातीची भिंत कोसळून ही घटना घडली आहे. घटनास्थळी गर्दी जमली होती.
अर्जुन मादार (वय 45) व त्यांचा मुलगा महेंद्र मादार (वय 19) हे दोघेही मातीच्या ढिगाऱयाखाली अडकले होते. त्यांना वाचविण्यात आले. हे पिता-पुत्र किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
बंदोबस्तामुळे सरकारी यंत्रणा पोहोचण्यास थोडासा विलंब झाला. मात्र स्थानिक नागरिकांनी ढिगारा हटवून मदतकार्य सुरू केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र जैन यांच्या बांधकामासाठी पायाखोदाई सुरू असताना शेजारच्या घराची भिंत पडून ही घटना घडली आहे. मालक, कंत्राटदार आदींवर दुर्लक्षपणाचा ठपका ठेवून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.