वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय हँडबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी दिग्विजय चौताला यांची निवड करण्यात आली असून जगन मोहनराव यांची सरचिटनीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून अखिल भारतीय हँडबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड काही मतभेदांमुळे करण्यात आली नव्हती. पण अखिल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या मध्यस्थीने या वादावर सामोपचाराने पडदा टाकल्यानंतर ही निवडणूक सुरळीतपणे पार पडली. भारतीय क्रीडा क्षेत्राशी सलग्न असलेल्या हँडबॉल संघटनेमधील काही समस्यांवर यशस्वी तोडगा भारतीय ऑलिंपिक संघटनेने काढला. या संघटनेमध्ये जगन मोहन राव आणि चौताला असे दोन प्रतिस्पर्धी गट पडले होते. या दोन्ही गटांमध्ये संघटनेवर वर्चस्वाचा दावा केला जात होता. या दोन्ही गटांना एकत्र आणून त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात भारतीय ऑलिम्पिक संघटना यशस्वी ठरली. त्यानंतर अखिल भारतीय हँडबॉल संघटनेची निवडणूक घेण्यात आली आणि दिग्विजय चौताला यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या संघटनेच्या खजिनदारपदी तेजराजसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.