वृत्तसंस्था/ गांधीनगर
भाजपचे आमदार शंकर चौधरी हे मंगळवारी गुजरात विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडले गेले आहेत. गांधीनगरमध्ये 15 व्या राज्य विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान भाजपचे ज्येष्ठ आमदार जेठाभाई भारवाड यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी पक्ष काँग्रेससह आम आदमी पक्षानेही या दोघांना समर्थन दिले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चौधरी यांचे तर राज्याचे अर्थमंत्री कन्नू भाई देसाई यांनी भारवाड यांचे नाव सुचविले होते. बनासकांठा जिल्हय़ातील थराड मतदारसंघाचे आमदार असलेल्या चौधरी यांनी यापूर्वी आनंदीबेन पटेल तसेच विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. तर भारवाड हे पंचमहल जिल्हय़ातील शेहरा मतदारसंघात 6 वेळा निवडून आले आहेत.