खानापूर : विधानसभा निवडणुकीची तयारी शासकीय पातळीवर अंतिम टप्प्यात आली असून याबाबत सर्व सिद्धता पूर्ण करण्यात आली असून खानापूर तालुक्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी खानापूर तालुका निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी शुक्रवारी खानापूर तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करुन काही सूचना केल्या. तसेच शहरातील मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यात शासन पूर्ण तयारीनिशी सिद्ध झाले असून याबाबत तालुक्यातील मतदान केंद्रे, तेथील मतदान व्यवस्था, मतदान केंद्रातील सुविधा, मतदाराना सुरक्षित मतदान करता यावे, यासाठी अधिकाऱ्यांना यावेळी सूचना देण्यात आल्या. तसेच शहरातील सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्यात आली. मतदान प्रक्रियेच्या वेळी तालुक्यातील मतदान केंद्रावर रवाणगी करण्यासाठी तसेच मतदान झाल्यानंतर मतपेट्यांचे एकत्रिकरण करण्यासाठी यापूर्वी सर्वोदया विद्यालयाचा वापर करण्यात येत होता. मात्र यावेळी मराठा मंडळ महाविद्यालय व सिद्धिविनायक हायस्कूलमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याकारणाने मराठा मंडळ महाविद्यालयाची निवडणूक अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मराठा मंडळ महाविद्यालय व सिद्धिविनायक हायस्कूल यावेळी मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे पाठवणे व एकत्रित करणे ही प्रक्रिया येथे केली जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत सूचना यावेळी अधिकाऱ्यांनी केल्या. या बैठकीत तहसीलदार प्रकाश गायकवाड, उपतहसीलदार व्ही. आर. मॅगेरी, व्हि. एस .हिरेमठ, सुनील देसाई, एस. बी. टक्केकर, आदीसह अन्य कर्मचारी उपस्थित होते.