टुगेदर फॉर सांखळी गटाकडून राजेश सावळ, भाजपतर्फे यशवंत माडकर यांचा अर्ज सादर
प्रतिनिधी /डिचोली
सांखळी पालिकेच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्षपदासाठी आज गुरुवार दि. 26 मे रोजी संध्याकाळी 3.30 वा. साखळी नगरपालिका कार्यालयात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपल्या गटाचे वर्चस्व राखण्यासाठी दोन गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. नगराध्यक्षपदासाठी टुगेदर फॉर सांखळी गटातर्फे विद्यमान उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. तर भाजप गटातर्फे नगरसेवक यशवंत माडकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
सांखळी नगरपालिकेचे सत्तानाटय़ आणि राजकीय घडामोडी याची संपूर्ण राज्याला जाणीव आहे. भाजप गटाकडून ही पालिका स्वतःकडे राखण्यासाठी झालेल्या प्रयत्नांमुळे झालेले राजकारण आणि प्रत्येक विकासकामात झालेला राजकीय हस्तक्षेप सर्वश्रुत आहे. तरीही सत्ता आपल्याकडेच ठेवण्यात धर्मेश सगलानी यांचा टुगेदर फॉर सांखळी गट यशस्वी ठरला होता. प्रसंग या गटाने न्यायालयाची पायरीही चढून सांखळी नगरपालिकेतील कामांना वेग दिला होता.
याच राजकारणात गेल्या चार वर्षांमध्ये भाजप गटाने आठ ते नऊ महिने या पालिकेची सत्ता आपल्याकडे खेचून आणली होती. परंतु नगरसेवक दामू घाडी यांच्या निधनानंतर मुजावरवाडा या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत टुगेदर फॉर साखळी गटाचे राजेंद्र आमेशकर हे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा या पालिकेची सत्ता या गटाकडे आली होती. या गटातर्फे गेल्यावषी (मे 2021) राया पार्सेकर यांना नगराध्यक्ष बनविण्यात आले होते. त्यांनी आपल्या एका वर्षांच्या कार्यकाळानंतर सामंजस्य करारानुसार नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने आता रिक्त पदासाठी निवडणूक होणार आहे.
टुगेदर फॉर साखळी या गटात सध्या उपनगराध्यक्ष राजेश सावळ, नगरसेवक राया पार्सेकर, राजेंद्र आमेशकर, ज्योती ब्लेगन, कुंदा माडकर व अन्सिरा खान यांचा समावेश आहेत. तर भाजप गटात नगरसेवक दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, शुभदा सावईकर व रश्मी देसाई या सहा जणांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या टुगेदर फॉर साखळी या गटाकडे बहुमत आहे.