ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यातील 7751 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातही एकूण 221 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. त्यापैकी 43 ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्या असून, आज 167 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू आहे. सकाळी साडेसात वाजता या मतदानाला सुरूवात झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील 13 पैकी 11 तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निवडणुकीमध्ये समावेश आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले होते. 221 ग्रामपंचायतींपैकी 27 ग्रामपंचायतींमधील सदस्य बिनविरोध झाले. तसेच या निवडणुकीत सरपंचाची निवड थेट केली जात असून, 49 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे आता सरपंचपदाच्या 167 जागांसाठी मतदान सुरू आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 167 जागांवर 519 उमेदवार, तर 1062 सदस्यपदांसाठी 3013 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
अधिक वाचा : आक्षेपार्ह टिप्पणी भोवली; हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा
दरम्यान, बिनविरोध झालेल्या 43 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. काँग्रेसने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तर भाजपला एकच जागा बिनविरोध जिंकता आली. त्यामुळे उर्वरित 167 ग्रामपंचायतींमध्ये आता चुरस पहायला मिळत आहे. मतमोजणी 20 डिसेंबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे, तर निकालाची अधिसूचना 23 डिसेंबर रोजी तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत.