पुणे / प्रतिनिधी :
सहाय्यक प्राध्यापकपदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) रविवारी घेण्यात येणार असून, यासाठी 1 लाख 19 हजार 813 उमेदवारांनी अर्ज केला आहे. उमेदवारांना प्रवेशपत्रदेखील उपलब्ध करून देण्यात आले असून, महाराष्ट्र आणि गोवा येथील अनुक्रमे 258 व 7 अशा एकूण 265 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सेटचे सदस्य सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची 38 वी परीक्षा आहे. यासाठीची सर्व तयारी सेट विभागाकडून करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी मूळ ओळखपत्र व परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत आणावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.
अधिक वाचा : पुण्यातील व्यावसायिकाची दोन कोटींची फसवणूक