अवंतीपोरामध्ये चकमक
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथील अगनहंजीपोरा भागात गुरुवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत टीव्ही कलाकार अमरीन भट यांची हत्या करणारे दोन्ही दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर विभागाचे आयजी विजय कुमार यांनी दिली. सदर दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडून शस्त्रसाठा आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील चादुरा येथे दहशतवाद्यांनी बुधवारी टीव्ही अभिनेत्री अमरीन भट यांची गोळय़ा झाडून हत्या केली होती. गोळीबारात जखमी झाल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गोळीबारात अमरीन यांचा 10 वर्षांचा पुतण्याही जखमी झाला होता. घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला होता. त्यानंतर काही स्थानिकांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार अवंतीपोरा येथे गुरुवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला.