कोलकाता
तुर्कस्थान एअरलाईन्सच्या विमानाचे गुरुवारी कोलकाता येथे आपत्कालीन (इमर्जन्सी) लँडिंग करण्यात आले. हे विमान इस्तंबूलहून सिंगापूरला जात होते. त्याचे लँडिंग पश्चिम बंगालमधील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाले. प्रवासादरम्यान एका 69 वषीय प्रवाशाची प्रकृती खालावली होती. संबंधित प्रवाशावर विमानतळावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास लँडिंग केलेल्या विमानाने दुपारी 2.30 वाजता पुन्हा सिंगापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला.
विमानातील प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी पायलटला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानातील अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार विमानातील एका वयोवृद्ध प्रवाशाच्या नाक आणि तोंडातून रक्त येऊ लागल्याने आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी घेतली. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. वैमानिकाने परिस्थितीची माहिती कोलकाताच्या एअर ट्रफिक कंट्रोलरला (एटीसी) देऊन विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी घेण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता एटीसीने वैमानिकाला खाली उतरण्यास सकाळी 11.45 परवानगी दिली होती.