वृत्तसंस्था/ मँचेस्टर
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या इंग्लंडच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील येथे सुरू असलेल्या दुसऱया सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी इंग्लंडने उपाहारापर्यंत पहिल्या डावात 56 षटकात 5 बाद 212 धावा जमवित दक्षिण आफ्रिकेवर 61 धावांची आघाडी मिळविली. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 151 धावांत संपुष्टात आला होता.
या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडचा केवळ तीन दिवसात डावाने पराभव करत आघाडी मिळविली होती. या दुसऱया कसोटीत इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 53.2 षटकात 151 धावांत आटोपला. नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रबाडाने 72 चेंडूत 2 चौकारासह 36 धावा जमविल्याने दक्षिण आफ्रिकेला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडतर्फे अँडरसन आणि ब्राँड यांनी प्रत्येकी 3 तर स्टोक्सने 2 व लीच आणि रॉबिनसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
इंग्लंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील दुसऱया षटकातच त्यांचा सलामीचा फलंदाज लीस एन्गिडीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 4 धावा जमविल्या. त्यानंतर नॉर्त्जेने ओलि पोपचा त्रिफळा उडविला. पोपने 4 चौकारासह 23 धावा जमविल्या. रबाडाने रुटला 9 धावावर झेलबाद केले त्यावेळी इंग्लंडची स्थिती यावेळी 3 बाद 43 अशी होती. त्यानंतर क्राऊली आणि बेअरस्टो यांनी संघाचा डाव सावरला.
इंग्लंडने 3 बाद 111 या धावसंख्येवरून शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवसाला प्रारंभ केला आणि नॉर्त्जेने बेअरस्टोला झेलबाद करून आपल्या संघासमोरील मोठा अडथळा दूर केला. बेअरस्टोने 63 चेंडूत 7 चौकारासह 49 धावा जमविताना क्राऊलीसमवेत चौथ्या गडय़ासाठी 91 धावांची भागीदारी केली. नॉर्त्जेने उपाहारापूर्वी इंग्लंडला आणखी एक धक्का देताना क्राऊलीला व्हेरेनीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 5 चौकारासह 38 धावा जमविल्या. इंग्लंडचा निम्मा संघ 147 धावांत तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार स्टोक्स आणि फोक्स यांनी सावध फलंदाजी करत सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 65 धावांची भर घातली होती. स्टोक्स 1 षटकार आणि 3 चौकारासह 34 तर फोक्स 4 चौकारासह 33 धावावर खेळत होते. 56 षटकाअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 5 बाद 212 धावा जमवित दक्षिण आफ्रिकेवर 61 धावांची आघाडी मिळविली आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे नॉर्त्जेने 41 धावात 3 तर रबाडा आणि एन्गिडी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका प. डाव 53.2 षटकात सर्वबाद 151 (रबाडा 36, पीटरसन 21, व्हेरेनी 21, एल्गार 12, व्हॅन डेर डय़ूसेन 16, मॅरक्रम 14, नॉर्त्जे 10, अँडरसन 3-32, ब्रॉड 3-37, स्टोक्स 2-17, रॉबिनसन 1-48, लीच 1-11), इंग्लंड प. डाव 56 षटकात 5 बाद 212 (लीस 4, क्राऊली 38, पोप, 23, रुट 9, बेअरस्टो 49, स्टोक्स खेळत आहे 34, फोक्स खेळत 33, नॉर्त्जे 3-41, रबाडा 1-77, एन्गिडी 1-32).
(धावफलक उपाहारापर्यंत)