पदार्पणवीर पेसर ल्यूक वूड व ऍलेक्स हॅलेस यांचे लक्षवेधी योगदान, हॅरी ब्रूकची फटकेबाजी
कराची / वृत्तसंस्था
पदार्पणवीर जलद गोलंदाज ल्यूक वूड, हॅरी ब्रूक व पुनरागमनवीर ऍलेक्स हॅलेसच्या लक्षवेधी प्रदर्शनाच्या बळावर इंग्लंडने येथील पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. पाकिस्तानने 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्यानंतर इंग्लंडने 19.2 षटकात 4 गडय़ांच्या बदल्यात 160 धावांसह सहज विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने 7 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
पाकिस्तानने 7 बाद 158 धावांपर्यंत मजल मारली, त्यात रिझवानच्या 46 चेंडूतील 68 धावांच्या खेळीचा मोलाचा वाटा राहिला. कर्णधार बाबर आझमने 24 चेंडूत जलद 31 धावा केल्या. इंग्लिश पदार्पणवीर ल्यूक वूडने 24 धावात 3 बळी घेत पाकिस्तानच्या डावाला ब्रेक लावला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
विजयासाठी 159 धावांचे आव्हान असताना, इंग्लंडतर्फे ऍलेक्स हॅलेस (53) व युवा फलंदाज हॅरी ब्रूक (नाबाद 42) यांनी उत्तम फटकेबाजी करत संघाला फिनिशिंग लाईन सहज पार करुन दिली. पाकिस्तानतर्फे फिरकीपटू उस्मान कादीरने 36 धावात 2 बळी घेतले.
प्रारंभी, सलामीवीर फिल सॉल्ट 10 धावांवर बाद झाल्याने इंग्लंडची खराब सुरुवात झाली. शाहनवाज दहानीच्या गोलंदाजीवर डीप स्क्वेअरलेगवरील हैदर अलीने त्याचा झेल टिपला. त्यानंतर डेव्हिड मलानने हॅलेसच्या साथीने फटकेबाजी सुरु केली. 6 षटकांच्या पॉवर प्लेनंतर इंग्लंडची 1 बाद 47 अशी स्थिती होती. फिरकीपटू कादीरने मलानला बाद करत आणखी एक धक्का दिला तर बेन डकेटला (17 चेंडूत 21) बाद करत कादीरने आपला दुसरा बळी नोंदवला.
पुढे, यॉर्कशायरचा युवा फलंदाज ब्रूकने पूर्ण स्वातंत्र्याने फटकेबाजी करत क्षेत्ररक्षणातील गॅप शोधले आणि त्याचप्रमाणे 7 चौकार वसूल केले. हॅलेसने 2019 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना शानदार अर्धशतक साजरे केले. ब्रूक व हॅलेस यांची 55 धावांची भागीदारी हॅरीस रौफने संपुष्टात आणली. पण, तोवर बराच उशीर झाला होता. हॅलेस 40 चेंडूत 53 धावांवर बाद झाला. ब्रूक व कर्णधार मोईन अली यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान ः 20 षटकात 7 बाद 158 (मोहम्मद रिझवान 46 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 68, बाबर आझम 24 चेंडूत 31, इफ्तिकार अहमद 17 चेंडूत 3 षटकारांसह 28. अवांतर 4. ल्यूक वूड 4 षटकात 3-24, आदिल रशिद 2-27, सॅम करण, मोईन अली प्रत्येकी 1 बळी).
इंग्लंड ः 19.2 षटकात 4 बाद 160 (ऍलेक्स हॅलेस 40 चेंडूत 7 चौकारांसह 53, हॅरी ब्रूक 25 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 42, डेव्हिड मलान 15 चेंडूत 20, बेन डकेट 17 चेंडूत 21, मोईन अली नाबाद 7. अवांतर 7. उस्मान कादीर 4 षटकात 2-36, शाहनवाज दहानी, हॅरिस रौफ प्रत्येकी 1 बळी).