दुबळय़ा नेदरलँड्सच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई! जोस बटलर 70 चेंडूत नाबाद 162!
ऍम्स्टलव्हीन / वृत्तसंस्था
जोस बटलर (70 चेंडूत 7 चौकार, 14 षटकारांसह नाबाद 162), डेव्हिड मलान (109 चेंडूत 9 चौकार, 3 षटकारांसह 125), सॉल्ट (93 चेंडूत 14 चौकार, 3 षटकारांसह 122) या त्रिकुटाने आक्रमक शतके फटकावल्यानंतर इंग्लंडने त्या बळावर नेदरलँड्सविरुद्ध पहिल्या वनडेत 4 बाद 498 धावांचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा आपलाच विक्रम त्यांनी यावेळी मागे टाकला. येथील लढतीत इंग्लंडतर्फे एकूण 26 षटकार व 36 चौकारांची आतषबाजी झाली. लियाम लिव्हिंगस्टोनने 46 व्या षटकात 32 धावांची बरसात करत दिमित्री मॅस्कारेन्हासचा एका षटकात 30 धावांचा विक्रम मागे टाकला.
इंग्लंडने या लढतीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि याचा लाभ घेत इंग्लिश संघाने चौफेर फटकेबाजी केली. जेसॉन रॉय (1) स्नेटरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्यानंतर फिलीप सॉल्ट क्रीझवर आला आणि इथूनच सारे चित्र पालटले. त्याने अवघ्या 93 चेंडूत 122 धावांची आतषबाजी केली.
सॉल्ट परतल्यानंतर डेव्हिड मलानने त्याची जागा तितक्याच ताकदीने भरुन काढली आणि 109 चेंडूत 125 धावांसह वनडे क्रिकेटमधील आपले पहिले शतक साजरे केले. अर्थात, या दोघांनी शतके झळकावली असली तरी खरे वादळ येणे अद्याप बाकी होते. ते जोस बटलरच्या रुपाने घोंघावले. बटलरने 27 चेंडूत अर्धशतक तर 47 चेंडूत शतक फटकावत नेदरलँड्सच्या प्रत्येक गोलंदाजाची यथेच्छ धुलाई केली. इतके कमी की काय म्हणून लिव्हिंगस्टोनने 22 चेंडूत 66 धावांची आतषबाजी करत नेदरलँड्सच्या जखमेवर आणखी मीठ चोळले.
वनडे क्रिकेटमध्ये डावात सर्वाधिक धावा
संघ / धावा / षटके / प्रतिस्पर्धी / मैदान / तारीख
इंग्लंड / 498-4 / 50.0 / नेदरलँड्स / ऍम्स्टलव्हीन / 17 जून 2022
इंग्लंड / 481-6 / 50.0 / ऑस्ट्रेलिया / नॉटिंगहम / 19 जून 2018
इंग्लंड / 444-3 / 50.0 / पाकिस्तान / नॉटिंगहम / 30 ऑगस्ट 2016
श्रीलंका / 443-9 / 50.0 / नेदरलँड्स / ऍम्स्टलव्हीन / 4 जुलै 2006
द. आफ्रिका / 439ö2 / 50.0 / विंडीज / जोहान्सबर्ग / 18 जाने 2015
द. आफ्रिका / 438-9 / 49.5 / ऑस्ट्रेलिया / जोहान्सबर्ग / 12 मार्च 2006
द. आफ्रिका / 438-4 / 50.0 / भारत / वानखेडे / 25 ऑक्टोबर 2015
ऑस्ट्रेलिया / 434-4 / 50.0 / द. आफ्रिका / जोहान्सबर्ग / 12 मार्च 2006
द. आफ्रिका / 418-5 / 50.0 / झिम्बाब्वे / पोश्चेफस्ट्रूम / 20 सप्टे. 2006
भारत / 418-5 / 50.0 / विंडीज / इंदोर / 8 डिसेंबर 2011.