वार्ताहर /काकती
भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद रवि राव आणि बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राव युवा अकॅडमी आयोजित येथील सरकारी कन्नड व उर्दू शाळेतील मुलींसाठी 11 जून रोजी किक अँड शॉट स्वसंरक्षण कार्यशाळा मोठय़ा उत्साहात झाली.
कार्यशाळेत सहभागी मुलींना आपत्कालीन संकटात बचावासाठी उपयुक्त तंत्र, शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक व्यायाम शिकविण्यात आला. तायक्वांदोच्या नियमित सरावाने आत्मविश्वास व साहस वाढते, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यासंदर्भात सरकारी कन्नड शाळेचे मुख्याध्यापक बी. एन. मडीवाळर यांनी मुलींनी स्वसंरक्षणाचे तंत्र आत्मसात करणे अनिवार्य आहे, असे आवाहन केले.
शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक विजय राजमनी यांनी तायक्वांदोचा सराव करणे, संरक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करण्यासाठी स्वसंरक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. सरकारी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका एस. के. नाईक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यशाळेत अकरा वर्षांवरील 115 मुलींनी भाग घेतला.
सहभागी सर्व मुलींना तायक्वांदो मास्टर श्रीपाद राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तायक्वांदो राष्ट्रीय पंच स्वप्नील पाटील, वैभव पाटील यांनी सहप्रशिक्षक म्हणून काम बजावले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जितेश पुजारी, त्रिवेणी भडकन्नवर, श्रेया अतिवाडकर व श्रीराज पाटील यांनी परिश्रम घेतले.