केंद्र सरकारकडून सावधगिरीच्या उपाययोजना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील मंकीपॉक्सच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी उचलल्या जाणाऱया उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी एक टास्क फोर्स (कृती दल) स्थापन करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून सोमवारी ही माहिती देण्यात आली. हे टास्क फोर्स देशातील संसर्ग शोधण्यासाठी चाचणी केंद्रांच्या विस्ताराबाबत सरकारला मार्गदर्शन करेल आणि रोग टाळण्यासाठी लसीकरणाशी संबंधित बाबींवर लक्ष ठेवेल. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल हे टास्क फोर्सचे नेतृत्त्व करतील.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अलीकडेच मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. सध्या जागतिक स्तरावर 75 देशांमध्ये मंकीपॉक्सची 16 हजारहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. वाढत्या संसर्गामुळे भारतातही आता सावधगिरीच्या उपाययोजना वाढविण्यात आल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातीतून नुकताच केरळला परतलेल्या 22 वषीय व्यक्तीचा शनिवारी मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला. भारतात आतापर्यंत या संसर्गाची चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात सध्या सुरू असलेल्या सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यासाठी 26 जुलै रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.