प्रतिनिधी /बेळगाव
सध्या सुरू असणारे शैक्षणिक वर्ष अर्धे संपले तरी अद्याप शालेय विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 66 हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे मागील वषीचा गणवेश घालून विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. पहिलीचे विद्यार्थी गणवेशाविना शाळांमध्ये उपस्थित राहत आहेत.
दरवर्षी शाळा सुरू झाल्या की, पंधरा दिवसांत नवीन पाठय़पुस्तके व गणवेश विद्यार्थ्यांना मिळत होते. त्यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्याची ओढ होती. परंतु यावषी शाळा सुरू होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे खराब झालेले मागील वर्षीचे गणवेश विद्यार्थ्यांना घालावे लागत आहेत.
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात पहिली ते दहावीपर्यंत 1.41 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले आहेत. परंतु बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ामध्ये गणवेश वितरणासाठी विलंब होत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात एकूण 2 लाख 9 हजार 316 विद्यार्थी असून त्यापैकी 1 लाख 43 हजार विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले आहेत. उर्वरित 66 हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. टप्प्याटप्प्याने राज्य सरकारकडून गणवेशाचे वितरण सुरू असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनानंतरच्या मंदीमुळे पालक भरडले जात असल्याने अनेकांनी मुलांना सरकारी शाळेत दाखल केले. परंतु त्यांना गणवेश मिळाले नाहीत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 2 जोड गणवेश दिले जातात. परंतु यावषी गणवेशासाठी विलंब झाला आहे.
त्यांनाही गणवेश लवकरच
जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. टप्प्याटप्प्याने गणवेश वितरण केले जात आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाही, त्यांना लवकरच दिला जाणार आहे.