महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्यानगरीत लीन : दौऱ्यामुळे काहींना वेदना होत असल्याचाही ‘चिमटा’
वृत्तसंस्था/ अयोध्या
राम मंदिर हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नसून प्रखर हिंदुत्त्वाच्या आस्थेने आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. अयोध्येतील राम मंदिर हे भारतीयांसाठी अस्मिता असल्याचे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा राम मंदिराचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न साकार होताना आपल्याला अत्यानंद होत असल्याचे शिंदे म्हणाले. शेकडो कार्यकर्त्यांसह अयोध्येत पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच सायंकाळच्या सुमारास त्यांनी महाआरतीही केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी आमदार-खासदार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह अयोध्येत पोहोचले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रामलल्लाचे दर्शन आणि पूजा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्याचे नाव न घेता शिंदे यांनी उपरोधिक टोमणे मारले. सत्तेच्या लालसेने काही लोकांनी वडिलांच्या वचनाकडे लक्ष दिले नाही. ज्यांनी तारीख मागितली होती, त्यांना यापूर्वीच घरचा रस्ता दाखवला आहे. आज आमच्या डोळ्यांसमोर राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यात पंतप्रधानांचे मोठे योगदान असल्याचे सांगत शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. भव्य राम मंदिर येथे बांधले जात आहे. देश-विदेशातील अनेक लोकांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. यासाठी मी केंद्र सरकारबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो, असे शिंदे पुढे म्हणाले. 2019 मध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार व्हावे, असा जनतेचा मानस होता. आम्ही सुधारणा करून असे सरकार स्थापन केले. भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एक असल्यामुळे आमचा इथपर्यंतचा प्रवास झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांच्या नावे ‘महाराष्ट्र भवन’
महाराष्ट्रातील मागील सरकारवर निशाणा साधत एकनाथ शिंदे यांनी पालघरमध्ये एका संताची हत्या आणि नौदलाच्या अधिकाऱ्याला मारहाण झाली तेव्हा कोणाचे सरकार होते, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रातील लोक वेगळे नाहीत. योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्र भवनासाठी विनंती केल्याचे सांगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या नावाने अयोध्यानगरीत महाराष्ट्र भवन साकारणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
राम मंदिर श्र्रद्धा, आदर, अस्मितेशी निगडीत
राम मंदिर हे आमच्या श्र्रद्धा, आदर आणि अस्मितेशी निगडित आहे. अयोध्या हा आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा आहे. आमचा प्रवास पूर्णपणे धार्मिक आहे. अनेकांना याची अॅलर्जी आणि वेदनाही आहेत. मात्र, हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे. आमचा धर्म कोणाचाही अनादर करणारा नाही, असे सांगत 2024 मध्ये शिवसेना पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवेल असा आशावाद शिंदे यांनी व्यक्त केला.
रोड शो… रामलल्लाचे दर्शन… आरती…
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम कथा पार्क येथून रोड शो केला. शेकडो समर्थकांच्या घोषणांच्या निनादात दोघांनी थेट श्री रामजन्मभूमी गाठली. तेथे रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आरतीही केली. मंदिरातील मुख्य आचार्य सत्येंद्रदास आणि ट्रस्टच्या सदस्यांनी रामनाम आणि मंदिराची प्रतिकृती देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मंदिराच्या दरवाजासाठी शिंदे यांनी सागवान लाकूड सुपूर्द केले. राममंदिराच्या गर्भगृहात स्पंदनशील ऊर्जा जाणवत असल्याचे मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले.
चंद्रपूरचे सागवानी लाकूड मंदिराला अर्पण
अयोध्येतील राम मंदिराच्या खिडक्या आणि दरवाजांसाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सागवान लाकूड निवडण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते लाकूड मंदिर व्यवस्थापनाला सादर केले. डेहराडूनस्थित राष्ट्रीय वन संशोधन संस्थेने राम मंदिर व्यवस्थापनाला चंद्रपूरच्या जंगलातील सागवान लाकूड वापरण्याचा सल्ला दिला होता. हे सागवानी लाकूड सुमारे 1000 वर्षे पूर्णपणे टिकाऊ आणि चमकदार राहणार असल्यामुळे त्याची निवड मंदिर उभारणीसाठी करण्यात आली आहे.