भाजपची 130 जणांची पहिली उमेदवार यादी आज होणार जाहीर
प्रतिनिधी/ बेंगळूर
10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी सोमवारी सकाळी जाहीर करण्यात येणार आहे. तर 13 एप्रिलनंतर उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. काँग्रेस आणि निजदकडून काही मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सत्ताधारी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत होता. दरम्यान, रविवारी नवी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक पार पडली. यावेळी सर्व 224 मतदारसंघांसाठी उमेदवार निवडीबाबत आढावा घेण्यात आला. अंतिमत: 130 मतदारसंघाची यादी तयार झाली असून सोमवारी सकाळी जाहीर केली जाणार आहे.
आज जाहीर होणाऱ्या यादीत 7-8 विद्यमान आमदारांना वगळता सर्वांना तिकीट मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. उमेदवार निवडताना गुजरात निवडणुकीतील निकष न पाळता 70 वर्षे ओलांडलेल्या विद्यमान आमदारांना विजयाच्या जोरावर तिकीट मिळणार आहे.
राज्यातील सर्व 224 मतदारसंघांसाठी राज्य भाजपने उमेदवारांची नावे निश्चित केली होती. प्रत्येक मतदारसंघासाठी तिघांची नावे सूचित करत यादीच्या प्रारंभी कोणताही वाद नसलेले, आरोप नसलेले, अधिक वय नसलेले विद्यमान आमदार आणि मागील निवडणुकीत कमी मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांची नावे समाविष्ट केली होती. दरम्यान, उमेदवारांची निवड करण्यासाठी रविवारी रात्री नवी दिल्ली येथे भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. यावेळी पहिल्या यादीत 130 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
बैठकीच्या प्रारंभी, 15 सदस्यीय भाजप केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवार निवडीसाठी प्रदेश समितीने पाठविलेल्या इच्छुकांच्या यादीचा आढावा घेतला. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, संसदीय मंडळाचे सदस्य बी. एस. येडियुराप्पा, सर्बानंद सोनवाल, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपूर, सुधा यादव, सत्यनारायण जटिया आणि राष्ट्रीय संघटना प्रधान कार्यदर्शी बी. एल. संतोष सहभागी झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होणाऱ्या 13 एप्रिल रोजी उर्वरित सर्व मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे.
पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली सविस्तर चर्चा : बोम्माई संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी, उमेदवार निवडीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सविस्तर चर्चा झाली आहे. सोमवारी सकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले.