कोणतीही कृती तिच्या योग्य प्रमाणात आणि आपली क्षमता पाहून करावी लागते. अन्यथा, तिचे दुष्परिणाम इतके भयानक होऊ शकतात की, नंतर केवळ पश्चात्ताप करणे आपल्या हाती राहते. असाच अनुभव एका व्यायामपटूला आला आहे. चीनच्या हेनान प्रांतातील ही व्यक्ती आहे. तेथील वृत्तपत्रात या व्यक्तीची माहिती प्रसिद्ध झाली आहे. ती खरोखरच हृदयद्रावक म्हणावी लागेल.
ही 60 वर्षांची व्यक्ती आज चालूफिरु शकत नाही. तिला एका जागेवर राहूनच आपला दिनक्रम पार पाडावा लागतो. ती आता पूर्णपणे परस्वाधीन झाली आहे. तिची अशी अवस्था का झाली ? याला कोणतेही नैसर्गिक कारण नाही किंवा तिच्या वयामुळेही असे झालेले नाही. या स्थितीला त्याच व्यक्तीची चूक कारणीभूत असल्याचे आता उघड झाले आहे. हा इतरांसाठी धडा आहे.
या व्यक्तीने वयाच्या चाळीसाव्या वर्षी व्यायाम सुरु केला. इतक्या वाढलेल्या वयात व्यायाम सुरु केल्यास तो फार करणे योग्य नसते. पण या व्यक्तीला व्यायामाचे व्यसनच लागले. प्रतिदिन ती 8 तास व्यायाम करीत असे सकाळी पळणे, वजन उचलणे, डंबेल्स, दंड, बैठका असा विविध प्रकारचा व्यायाम करण्यात येत असे. या अतिव्यायामामुळे आता या व्यक्तीची गात्रे इतकी दुर्बळ झाली आहेत, की ती निष्क्रीय झाली आहेत. अती तेथे माती, हेच खरे आहे.