प्रतिनिधी /बेळगाव
केएलईच्या बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालय व आरोग्य भारती संस्थेची बेळगाव शाखा यांच्यावतीने दि. 27 ते 29 जानेवारीदरम्यान महिला विद्यालयाच्या सभागृहात औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अलीकडील काळात आयुर्वेदाचे महत्त्व वाढले असून विद्यार्थ्यांना त्याची माहिती व्हावी, या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. मिलिंद हलगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाविद्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आयुर्वेद हे पूर्वापार चालत आलेले वैद्यकीय शास्त्र आहे. आपल्या सभोवती असंख्य वनस्पती असतात. मात्र, त्यांची माहिती अनेकांना नाही. जनमाणसांमध्ये आणि प्रमुख्याने विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचविण्याच्या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांना आपला वारसा आणि परंपरा यांची माहिती होईल. यावेळी प्राचार्य डॉ. सुहास शेट्टी म्हणाले, यंदा महाविद्यालयाने 90 वर्षे पूर्ण केली आहेत. येथे आज 809 विद्यार्थी आयुर्वेदाचा अभ्यास करत आहेत. प्रदर्शनादरम्यान अंतिम वर्षातील विद्यार्थी वनस्पतींची माहिती लोकांना देतील. दररोज सकाळी 9 ते 2.30 व दुपारी 4.30 ते 7 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. त्याचा बेळगावकरांनी प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे. यानिमित्त तिन्ही दिवस विविध वैद्य उपस्थितांना मार्गदर्शन करतील. 27 रोजी सकाळी 10.30 वा. डॉ. सुहास शेट्टी आरोग्यमय जीवनशैली विषयावर, 28 रोजी डॉ. वैष्णवी काथवटे, 29 रोजी डॉ. श्रीनिवास पाटील यांचे सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत तर डॉ. ए. एस. चंद्रशेखर यांचे औषधी वनस्पती विषयावर दुपारी 12 ते 1 या वेळेत व्याख्यान होणार आहे, अशी माहिती डॉ. वैष्णवी काथवटे यांनी दिली. प्रदर्शन व व्याख्यान पूर्णत: विनामूल्य आहे.