वाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशातील वस्तूंची निर्यात 470 ते 480 अब्ज डॉलरच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज वाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे.
व्यापारी तूट ‘समाधानकारक पातळी’वर जाणार नाही असा विश्वास सचिवांनी यावेळी व्यक्त केला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत व्यापारी तूट 100 अब्ज डॉलरच्या पुढे गेली असल्याचेही ते म्हणाले.
2022-23 मध्ये वस्तूंची निर्यात 470 ते 480 अब्ज डॉलर होण्यासोबतच त्याच दरम्यान, सेवा क्षेत्राची निर्यात अंदाजे 280 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचणार असल्याचेही सचिवांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच निर्यात ध्येयाबाबत आम्ही योग्य त्या मार्गावर प्रवास करत असून आम्ही चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले ध्येय नंतर जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीने 669.65 अब्ज डॉलरचा उच्चांक गाठला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 34.50 टक्क्यांनी यात वाढ झाली आहे.
जागतिक बाजारातील स्थिती
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या किमती नरमल्या आहेत, त्यामुळे येत्या काही महिन्यांत व्यापारी तूट कमी होईल, असेही त्यांनी मत मांडले.