वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. दोन आठवडय़ापूर्वी कॅनडामध्ये तिला ही दुखापत झाली होती. त्यामुळे तिच्या निवृत्तीचा निर्णयही बदलण्याची शक्यता आहे. या स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचे तिने यापूर्वी जाहीर केले होते.
35 वर्षीय सानियाने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सांगितले की, ‘याच महिन्यात टोरांटोमध्ये झालेल्या कॅनेडियन ओपन स्पर्धेत ही दुखापत झाली होती. या स्पर्धेत खेळताना माझ्या मनगट व हाताच्या कोपराला दुखापत झाली. त्यावेळी त्याचे स्वरूप लक्षात आले नव्हते. पण नुकतेच स्कॅन केल्यानंतर त्याची स्थिती लक्षात आली. स्नायू दुखावल्यामुळे मी किमान चार आठवडे खेळू शकणार नाही. त्यामुळे मला दुर्दैवाने अमेरिकन स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे,’ असे तिने म्हटले आहे. यूएस ओपन स्पर्धा 29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
2022 मोसमाच्या अखेरीस टेनिसमधून निवृत्ती घेण्याचे तिने जाहीर केले होते. पण या घडामोडीमुळे तिने प्लॅन बदलला आहे. ‘निवृत्ती जाहीर करण्याची ही योग्य वेळ नसल्याने मी त्यात बदल केला आहे. लवकरच त्याबाबत मी जाहीर करेन,’ असे तिने पुढे म्हटले आहे.
टोरांटोतील स्पर्धेत सानिया व मॅडिसन कीज यांनी महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर गेल्या आठवडय़ात झालेल्या सिनसिनॅटी ओपन स्पर्धेतही तिने भाग घेतला होता. सानियाने ऑस्ट्रेलिया ओपन, विम्बल्डन, यूएस ओपन स्पर्धेत महिला दुहेरीचे एकेकदा जेतेपद मिळविले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया ओपन, प्रेंच ओपन, यूएस ओपनमध्ये तिने मिश्र दुहेरीतही अजिंक्यपद मिळविलेले आहे.