निलेश राणे आमदार होऊ देत ; वडील नारायण राणेंचे बाप्पाच्या चरणी साकडे
वार्ताहर / कुडाळ
“सिंधुदुर्ग राजाचा विजय असो”, “गणपती बाप्पा मोरया”, “पुढच्या वर्षी लवकर या, “गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला”, अशा नामघोषात ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत कुडाळ तालुक्यातील सतरा दिवसाच्या सिंधुदुर्ग राजा गणपतीची वाजत गाजत येथील पोस्ट ऑफिस नजीक भाजप कार्यालयाकडून गुरुवारी सायंकाळी 4 वाजता विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. येथील पावशी तलावात सिंधुदुर्ग राजा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गणेश भक्तांनी मोठ्या भक्तीभावाने बाप्पाला निरोप दिला. यावेळी गणेश भक्तांचे डोळे पाणावले होते. विसर्जनावेळी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत होता.
येथील पोस्ट ऑफिस नजीक भाजप कार्यासमोरील मंडपात निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजा गणपतीची सतरा दिवसांसाठी प्रतिष्ठापन करण्यात आली होती. सतरा दिवस विविध सामाजिक ,धार्मिक, कार्यक्रम याठिकाणी सुरु होते. माजी खासदार निलेश राणे पायी चालत या रॅलीत सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनाने वाहनांना एक दिशा मार्गाने वाहतूक सुरु ठेऊन चांगले नियोजन केले होते.
विसर्जना पूर्वी सिंधुदुर्ग राजा गणपतीची आरती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.निलेश राणे आमदार होऊ देत असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गच्या राजाच्या चरणी साकडे घातले.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, नीलम राणे, माजी खासदार निलेश राणे, युवा उदयोजक विशाल परब,ओरोस मंडळ तालुकाध्यक्ष दादा साईल,कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,भाजप उपाध्यक्ष रणजित देसाई, रुपेश कानडे, अँड राजीव कुडाळकर, निलेश परब, राजू राऊळ, राकेश कांदे,आनंद शिरवलकर, प्राजक्ता बांदेकर,नगरसेवक गणेश भोगटे,जिल्हा महिला मोर्चाच्या माजीअध्यक्षा संध्या तेरसे, मंगेश प्रभू, रामचंद्र राऊळ, चांदणी कांबळी आदी भाजप पदाधिकारी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.