पुणे / वार्ताहर :
ग्रामसेवकाला डांबून ठेवत विषारी औषध पाजण्याची भीती दाखवून त्याच्याकडून 73 हजार रुपये उकळल्याची घटना खडकवासला धरणाजवळच्या कुडजे गावात घडली. याप्रकरणी ग्रामसेवक महेशकुमार खाडे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेशकुमार खाडे हे कुडजे गावचे ग्रामसेवक आहेत. काल सायंकाळी ते कार्यालयीन काम संपवून घरी निघाले असता कुडजे गावच्या स्मशानभूमीजवळ आरोपींनी त्यांची गाडी आडवली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने बंद हॉटेलवर नेऊन त्यांचे हातपाय बांधून ठेवले. त्यांना विषारी औषधाची बाटली दाखवून ते पाजण्याची भीती दाखवत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी ग्रामसेवक खाडे यांनी स्वतःच्या खात्यात असलेले 49 हजार आणि आपल्या मित्राकडून आणखी 24 हजार मागून एकूण 73 हजार रुपये आरोपींना दिले. उद्या आणखी दीड लाख रुपये आणून दे नाहीतर तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू’ अशी धमकी आरोपींनी यावेळी दिली. मुख्य आरोपी सध्या फरार असून, इतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.