वृत्तसंस्था/ कोव्हिलपट्टी (तामिळनाडू)
हॉकी इंडियाच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ पुरूषांच्या 12 व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उत्तरप्रदेश आणि चंदिगढ यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. या स्पर्धेत उपांत्य लढतीत हरियाणाचा तर चंदिगढने ओडिशाचा पराभव केला.
शुक्रवारी येथे झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशने हरियाणाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात उत्तर प्रदेश संघातर्फे विजयकुमार गोंडने 14 व्या मिनिटाला तर कर्णधार शारदानंद तिवारीने 27 व्या मिनिटाला गोल केले. हरियाणातर्फे एकमेव गोल रजतने 47 व्या मिनिटाला नोंदविला.
दुसऱया उपांत्य सामन्यात चंदिगढने ओडिशाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. चंदिगढतर्फे रोहितने आठव्या मिनिटाला तर इंद्रपाल सिंगने 43 व्या मिनिटाला तसेच ओडिशातर्फे कर्णधार लुगुनने दुसऱया आणि 37 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. पेनल्टी शूटआऊटमध्ये चंदिगढतर्फे रमण, हरमनप्रित आणि अमृतपाल सिंग यांनी तर ओडिशातर्फे सुमीत किंडोने गोल केला. आता या स्पर्धेत रविवारी उत्तरप्रदेश आणि चंदिगढ यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार असून तत्पूर्वी हरियाणा आणि ओडिशा यांच्यात तिसऱया आणि चौथ्या स्थानासाठी लढत होईल.