सावंतवाडी/ प्रतिनिधी-
तब्बल महिन्याभरानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघात उद्या मंगळवारी 12 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता मुंबईहून गोवा मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. शिवसेने बंडाळी करून नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात केसरकर सामील झाले आणि त्यानंतर शिंदे गटाचे ते प्रवक्ते म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे शिंदे फडणीस सरकार गठीत झाल्यानंतर श्री केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. अद्यापही खातेवाटप झालेले नाही. मी वेगळ्या गाडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येईन असे त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते. येत्या 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर ते 12 जुलैला सावंतवाडीत दाखल होणार आहेत. सायंकाळी चार वाजता तहसीलदार कार्यालय येथे विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी परिस्थिती आढावा, सायंकाळी 4:30 वाजता तीनही तालुक्याच्या दक्षता समिती संदर्भात आढावा बैठक आणि सायंकाळी 5:30 वाजता श्रीधर अपारमेंट निवासस्थानी श्री साईबाबा पालखी आगमन व पूजन असा त्यांचा कार्यक्रम आहे. राज्यात सत्ता संघर्षाच्या बदलानंतर श्री केसरकर तब्बल आठ दिवसानंतर आपल्या मतदारसंघात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केसरकर समर्थक सज्ज झाले आहेत.