प्रतिनिधी /बेळगाव
शेट्टी गल्लीतील कॉर्नरवर असलेल्या डेनेजच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. मागील तीन वर्षांपासून या समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. अखेर या चेंबर आणि सीडीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला मुहूर्त मिळाला आहे. गुरुवारपासून या सीडी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शेट्टी गल्ली, कॉर्नर येथे गेल्या कित्येक वर्षांपासून ड्रेनेज चेंबर उघडय़ावर होते. हे डेनेज चेंबर ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी गटारीमधून वाहत होते. येथील डेनेज चेंबरच्या दुरुस्तीचा प्रयत्न महापालिकेने केला होता. तीन वर्षांपूर्वी येथील डेनेज चेंबरचे बांधकाम नव्याने केले होते. तरीदेखील डेनेजवाहिन्या तुंबण्याच्या समस्येचे निवारण झाले नाही. त्यानंतरही चेंबर तुंबून सांडपाणी ओव्हरफ्लो होत होते. त्यामुळे या डेनेज चेंबरमधील कचरा वेळोवळी काढण्यासाठी डेनेज चेंबर खुले ठेवण्यात आले होते.
परिणामी, वाहनधारकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. येथील डेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी तक्रार मागील तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. पण, महापालिका प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर डेनेज चेंबरच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त मिळाला असून काम सुरू करण्यात आले.
येथील गटारीवरील सीडी आणि डेनेज चेंबरचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आता येथील रस्ता काही दिवसांसाठी वाहतूककरिता बंद राहणार आहे. हे काम तातडीने पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.