कुठल्याही बँक खात्याची लूट शक्य : शहरातील काहींना आर्थिक फटका, सीईएन विभागाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा
बेळगाव : आता प्रत्येक कामासाठी आधारकार्ड लागतेच. राज्य सरकारने महिलांना मोफत बसप्रवासाची योजना सुरू केल्यानंतर बसप्रवासासाठीही आधारकार्ड कायम जवळ ठेवावे लागते. आधारकार्डवरील बायोमेट्रिक फिंगरप्रिंट हॅक करून सायबर गुन्हेगार त्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करू लागले आहेत. त्यामुळे आधारच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बायोमेट्रिक फिंगरप्रिंट हॅक करून एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवर दुसऱ्याचे नावही चढविले जाऊ शकते. बेळगाव येथील सायबर क्राईम विभागाकडे बायोमेट्रिक फिंगरप्रिंट हॅक झाल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांना यासंबंधी जागृतीसाठी पत्रक काढावे लागले आहे. सोशल मीडियावर सायबर क्राईम विभागाचे अधिकारी बायोमेट्रिक फिंगरप्रिंट हॅकिंगच्या प्रकाराबद्दल जागृती करीत आहेत.
सायबर गुन्हेगारांच्या कारवाया, गुन्ह्याची पद्धत वेळोवेळी बदलत असते. आता गुन्हेगारांनी आधारकार्डमधील बायोमेट्रिक फिंगरप्रिंट हॅक करून त्याचा वापर अनेक कारणांसाठी करू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बायोमेट्रिक्सच्या वापरापेक्षा गैरवापरच अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बेळगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर श्रीनिवास पाटील यांचे बायोमेट्रिक फिंगरप्रिंट हॅक करून त्यांच्या बँक खात्यातील पैसे पळविल्याची घटना घडली होती. यासंदर्भात त्यांनी शहर सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली होती. ते तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचले, त्यावेळी आधारकार्डमधील बायोमेट्रिक हॅक होतोच कसा? असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनीच असे होणार नाही, असे सांगून टाकले होते.
30 वेळा बायोमेट्रिक फिंगरप्रिंटचा वापर
आधारकार्डमधील माहिती सुरक्षित असते. ती कोणालाही चोरता येणार नाही, असा आजवरचा प्रत्येकाचा समज होता. मात्र, अलीकडच्या काही घटना लक्षात घेता हा समज चुकीचा ठरू लागला आहे. डॉ. श्रीनिवास पाटील यांनी आपण बँकेत न जाता, कोणालाही आपल्या बँक खात्याविषयी माहिती न देता आपल्या खात्यातील पैसे कसे गायब झाले? याविषयी स्वत:च शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तब्बल 30 वेळा त्यांच्या आधारकार्डमधील बायोमेट्रिक फिंगरप्रिंटचा वापर करून शोधाशोध करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
फिंगरप्रिंट हॅकिंगच्या प्रकारात वाढ
एक-दोन महिन्यातच फिंगरप्रिंट हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आधार बायोमेट्रिक फिंगरप्रिंटचा वापर करून एईपीएस (आधार अनेबल्ड पेमेंट सिस्टीम) च्या माध्यमातून अनेक सेवा घेता येतात. कॅश डिपॉझिट, कॅश विथड्रॉवल, बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट, फंड ट्रान्स्फर, आँथेंटिकेशन, भीम आधार पे, ई-केवायसी आदी करता येतात. याचाच फायदा घेत गुन्हेगार आधारमधील फिंगरप्रिंट्स क्लोन करून खातेधारकाला माहिती नसताना त्याच्या बँक खात्यातील रक्कम गायब करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एईपीएसच्या माध्यमातून रक्कम काढल्यानंतर त्याला ओटीपी येत नाही. त्यामुळे संबंधितांना आपली फसवणूक झाली आहे, हे लवकर कळतसुद्धा नाही. दोन दिवसांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या बँक खात्यातील 20 हजार रुपये फिंगरप्रिंट हॅक करून उचलण्यात आले आहेत. आधार अनेबल्ड पेमेंट सिस्टीमसाठी कसलेही कार्ड लागत नाही. आधार क्रमांक, फिंगरप्रिंट, आयव्ही स्कॅन आदी प्रक्रिया पूर्ण करून मायक्रो एटीएममधून व्यवहार करता येतो. आता याच व्यवस्थेत घुसून सायबर गुन्हेगार अनेक बँक खातेधारकांच्या खात्यातील रक्कम हडप करीत आहेत. एकदा गुन्हेगारांच्या हाती बायोमेट्रिक्स फिंगरप्रिंट संबंधीची माहिती मिळाली तर त्या व्यक्तीच्या नावे किती बँक खाती सुरू आहेत आणि कोणते व्यवहार आहेत? याची कुंडलीच गुन्हेगारांना सहजपणे मिळते.
फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी बाळगा
बायोमेट्रिक्स फिंगरप्रिंट हॅक करून गुन्हेगार एखाद्या ग्राहकाच्या बँक खात्यात शिरले तर ते रिकामे करूनच मोकळे होतात. केवळ एकदा रक्कम हडप करून ते स्वस्थ बसत नाहीत. पुन्हा पुन्हा त्या खात्यात नेमके किती पैसे जमा आहेत? हे पाहात असतात. सायबर गुन्हेगारांच्या हातचलाखीने बँक खातेधारकही थक्क होतो. आपण बँकेत गेलो नाही, पैसे काढले नाहीत तरीही आपल्या खात्यातील पैसे कोणी पळविले? हे त्याला कळत नाही. सध्या असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. आपल्या बँक खात्यात काय चालले आहे? यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन सायबर क्राईम विभागाकडून करण्यात आले आहे.
बायोमेट्रिक ब्लॉक करा
पोलीस आयुक्तांनी सोशल मीडियावर जागृती सुरू केली आहे. बायोमेट्रिक्स फिंगरप्रिंट हॅक करून होणारी फसवणूक टाळण्यासाठी काय करावे? याचा सल्लाही सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांनी दिला आहे. प्ttज्s://स्ब्aadप्aar.ल्ग्daग्.gदन्.ग्ह या लिंकच्या माध्यमातून लॉग ईन होऊन आपले व आपल्या कुटुंबीयांचे आधारकार्डवरील बायोमेट्रिक ब्लॉक करावे. तरच फसवणूक टाळता येणार आहे. बायोमेट्रिक हॅक करून एखाद्याच्या नावावरील मालमत्ताही हडप करणे शक्य आहे.