तीन ट्रॉलर जप्त, एकात सापडल्या एलईडी : समुद्रात गस्तीसाठी पोलिसांचे पथक स्थापन
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात दोन महिन्यांची मासेमारी बंदी कार्यवाही चालू झाली असून एका फिशिंग ट्रॉलरमध्ये एलईडी सापडल्याची माहिती हाती आली आहे. त्याची दखल घेवून मच्छीमारी खात्याने त्वरित कारवाई केल्याचे मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले. बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी खात्यातर्फे पोलिसांचे एक पथक स्थापन करण्यात आले असून ते समुद्रात गस्त घालून पाळत ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवाय 3 ट्रॉलर्स जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
एकूण 3 पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी मच्छीमारी खात्यास देण्यात आले असून ते पथक नजर ठेवणार असल्याचे हळर्णकर यंनी सांगितले. राज्यातील प्रमुख मच्छीमारी जेटीवर (धक्का) लवकरच सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असून त्याचे नियंत्रण खात्यातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, मच्छीमारी करणारे ट्रॉलर्स, कॅनोयांत्रिकी बोटी धक्क्यावर लावण्यात आल्या असून त्यावरील कामगारांनी आपल्या मूळ गावाची वाट धरली आहे. बोट मालकांनी बोटींची दुरुस्ती, डागडुजी हाती घेतली असून आता 2 महिने बोटींसह मालकांना व कामगारांना बंदीमुळे विश्रांती मिळाली आहे.