तिघा संशयितांना अटक : बस्तोडा पुलावरही एकाला मारहाण : एक जिवंत, एक रिकामी काडतूस जप्त : पहाटेच्या घटनेने खळबळ
प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा पोलीस स्थानकाच्या हद्दीत दर दिवशी एका मागोमाग एक असे गुन्हय़ांचे सत्र सुरूच असून मंगळसूत्र चोऱया, दरोडे, मारहाण, धर्मांतर, खुनी हल्ले आणि आता गोळीबारच्या घटनेने म्हापसा शहर हादरले आहे. पहाटे पणजीहून म्हापसा येथे आलेल्या तिघा संशयितांनी बस्तोडा पुलावर मोटरसायकलने जाणाऱयाला अडवून मारहाण केली तसेच आपल्याकडील पिस्तुलचा धाक दाखवत हवेत गोळीबार केला. नंतर म्हापसा शहरातील सिंडीकेट बँकजवळच्या बारमध्ये बसून मद्यप्राशन केले व बाहेर येत हवेत गोळीबार केल्याने आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत घटना सविस्तर जाणून घेतली व तासाभरात तिघाही संशयितांना अटक करण्यात यश मिळविले.
म्हापसा पोलिसांनी चोरी, मारहाण व गोळीबारच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. यात जेम्स डिसोझा (रा. धुळेर म्हापसा), विनायक सोमाजी (रा. माडेल-थिवी) व व्हिलीयम रॉड्रिगीस (रा. अन्साभाट म्हापसा) यांचा समावेश आहे. संशयित आरोपींनी वापरलेली जीए-03-आर-8976 ही ब्रिओ कार तसेच त्यांनी वापरलेले पिस्तुलही जप्त केले. घटनास्थळी पोलिसांना एक जिवंत व एक रिकामी काडतूस सापडले असून पोलिसांनी पंचनामा करून ती ताब्यात घेतली आहे. फॉरेन्सिकच्या ठसेतज्ञ व श्वानपथकानी येऊन घटनेचा पंचनामा केला.
बस्तोडा पुलावर मोटरसायकल चालकास मारहाण
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भल्या पहाटे तिघेही संशयित आपल्या वाहनाने पणजीहून म्हापसा येथे आले. त्यांनी बस्तोडा पुलावर मोटरसायकलने जाणाऱया डिचोली येथील नवीद शेख याला अडविले व आपण नार्कोटिक अधिकारी असल्याचे सांगून त्याची तपासणी करत गांजाची मागणी केली. त्याला पिस्तुलचा धाक दाखवत मारहाण केली व हवेत गोळीबार केला. त्याच्याकडील हेल्मेट काढून घेतले. नवीद शेख याने त्यांच्याकडून कशीबशी सुटका करुन घेत म्हापसा स्थानक गाठले. म्हापसा पोलिसांनी नावीद शेख यांच्या तक्रारीवरुन 341, 324, 170, 506 (ग्ग्) अन्वे 34 भादंसंच्या 25, 27, 30 सशस्त्र कलमाखाली तिघाही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
तावर्नमध्ये भांडण
पहाटे 5.30 वा.च्या दरम्यान संशयित आरोपी म्हापसा सिंडीकेट बँकजवळ असलेल्या पांडुरंग गल्लीतील कृष्णा गोलतेकर यांच्या तावर्न (बार) मध्ये गेले. तिथे त्यांनी मद्यप्राशन केले. या दरम्यान त्यांच्यात भांडण झाले. जेम्स व विनायक या दोघांनी बारच्या बाहेर येत हवेत गोळीबार केला व तेथून पळ काढला. व्हिलीयम तेथेच बसला होता. स्थानिकांनी घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना दिल्यावर डय़ुटीवरील साहाय्यक उपनिरीक्षक मळीक त्वरित घटनास्थळी दाखल झाले व तेथे असलेल्या व्हिलीयम याला ताब्यात घेतले.
तिघांच्याही मुसक्या आवळल्या
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेले तावर्न (बार) मालक व तेथील नागरिक तसेच सकाळी पुढे पेपर न्यायला आलेले सर्वेश शिरोडकर यांनी जेम्सला पळताना पाहिले. पोलिसांनी घटनेची माहिती उपअधीक्षक जिवबा दळवी व पोलीस निरीक्षक परेश नाईक यांना दिल्यावर तेही घटनास्थळी दाखल झाले. यात जेम्स नामक इसम गुंतल्याची माहिती मिळाल्यावर त्याचा शोध घेऊन अवघ्या तासाभरात जेम्ससह दोघांच्या मुसक्या आवळल्या. हा प्रकार गंभीर असल्याने येथे एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांची धावपळ
पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक योगेश गडकर, विराज कोरगावकर, ज्ञानेश्वर मळीक, आशिष परब, हवालदार सुशांत चोपडेकर, शिपाई राजेश कांदोळकर, प्रकाश पोवळेकर, अक्षय पाटील, अभिषेक कासार, आनंद राठोड यांनी बरेच परिश्रम घेऊन संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.
जेम्सची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची
संशयित आरोपी जेम्स हा गेल्या म्हापसा पालिकेच्या निवडणुकीत रिंगणात होता. त्याला 200 मते प्राप्त झाली होती. मात्र त्याचा पराभव झाला होता. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. बलात्कार, धमकावणे तसेच विविध गंभीर गुन्हे त्याच्या विरोधात आहे. पूर्वी त्याने पोलीस नोकरीही केली होती पण नंतर राजीनामा दिला होता.