रोईंगमध्ये दोन रौप्य व एक कांस्य तर नेमबाजीत एक रौप्य व एक कांस्यपदक : क्रिकेटमध्ये भारतीय महिला फायनलमध्ये
हॉकीत पुरुषांचा दणकेबाज विजय : महिला फुटबॉल संघाचे मात्र पॅकअप
वृत्तसंस्था/ हांगझाऊ (चीन)
19 व्या आशियाई गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी पहिल्याच दिवशी दमदार प्रारंभ करताना तीन रौप्य व दोन कांस्यपदकासह एकूण पाच पदकांची कमाई केली. यामध्ये रोईंगमध्ये 2 रौप्य व 1 कांस्य तर नेमबाजीत 1 रौप्य व 1 कांस्य अशी पदके मिळाली. याशिवाय, महिला क्रिकेट संघाने बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, पुरुष हॉकी संघाने दणक्यात सुरुवात करताना प्रतिस्पर्धी उझबेकिस्तानचा 16-0 असा धुव्वा उडवला. अन्य गटात सलग दुसऱ्या पराभवासह महिला फुटबॉल संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.
रविवारी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकून भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले खाते उघडले. मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चोक्सी या त्रिकुटाने 1886 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. चीनने 1896.6 गुणांसह सुवर्णपदक जिंकून नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. मंगोलियाने कांस्यपदक जिंकले. भारतीय महिलांनी सुवर्णविजेत्या चीनला चांगलीच टक्कर दिली पण अखेरच्या क्षणी त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
हरियाणाच्या रमिता जिंदालला कांस्य
महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रमिता जिंदालने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. 19 वर्षीय रमिताने 230.1 गुणांसह ही कामगिरी केली. शेवटच्या शॉटपर्यंत ती रौप्यपदकाच्या शर्यतीत होती. अखेरीस तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताची मेहुली घोष चौथ्या स्थानी राहिली. चीनला पहिले आणि दुसरे स्थान मिळाले.
रोईंगमध्ये भारताचा धडाका
नेमबाजीत खाते उघडल्यानंतर रविवारी सकाळी अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल स्पर्धेत रौप्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले. त्यानंतर पुरुषांच्या जोडीमध्ये लेख राम आणि बाबू लाल यादव या जोडीने कांस्यपदक पटकावले. तर दुपारच्या सत्रात पुरुषांच्या सांघिक 8 स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळाले.
रोइंगमध्ये भारताच्या अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल प्रकारात रौप्य पदक जिंकले. भारतीय जोडीने 6:28.18 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. चीनच्या जंजी फॅन आणि मॅन सन यांनी 6:23.16 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. उझबेकिस्तानच्या शाखझोद नुरमातोव आणि सोबिरजोन सफ्रोलीव्ह यांनी कांस्यपदक जिंकले. विशेष म्हणजे, अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंगसाठी हा मार्ग सोपा नव्हता. पाठीच्या दुखापतीमुळे अरविंदच्या खेळांच्या तयारीवर परिणाम झाला. जवळपास महिनाभर प्रशिक्षण घेता आले नाही. यानंतरही त्याने चमकदार कामगिरी करत देशासाठी रौप्यपदक जिंकून दिले. अर्जुन व अरविंद हे दोघेही लष्कराचे खेळाडू असून पुण्यामध्ये ते सराव करतात.
दरम्यान, भारताच्या बाबूलाल यादव आणि लेख राम यांना कॉक्सलेस जोडीमध्ये कांस्यपदक मिळाले, ज्यांनी 6:50.41 सेकंदाची वेळ नोंदवली. चीनने सुवर्णपदक तर उझबेकिस्तानने रौप्यपदक जिंकले. बाबूलाल व लेख राम यांनी शानदार कामगिरी करताना पदकाला गवसणी घातली.
याशिवाय, पुरुषांच्या कॉक्स 8 स्पर्धेत भारत आणि चीन यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. ज्यामध्ये भारतीय संघ 5:43.01 वेळ नोंदवून दुसऱ्या स्थानावर राहिला. चीनने 2.84 सेकंदाने बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघात नीरज, नरेश कलवानिया, नितीश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनीत कुमार आणि आशिष यांचा समावेश होता. इंडोनेशियाला कांस्यपदक मिळाले. जपान आणि उझबेकिस्तानसारख्या रोइंग दिग्गजांचे संघ अनुक्रमे पाचव्या आणि चौथ्या स्थानावर राहिले.
महिला फुटबॉल संघाचे आव्हान समाप्त
दरम्यान, महिला फुटबॉल संघाची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली. रविवारी झालेल्या गटातील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला थायलंडने 1-0 असे पराभूत केले. भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव होता. याआधी, चिनी तैपेईने महिला संघाच पराभव केला होता. सलग दोन पराभवामुळे भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, या सामन्यात थायलंडने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना भारतीय संघाला जराही वरचढ होऊ दिले नाही. संपूर्ण सामन्यात थायलंडचे वर्चस्व दिसून आले.
बॉक्सिंगमध्ये निखत झरीन, प्रीतीची आगेकूच
भारताची दोन वेळ वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीनने रविवारी शानदार सुरुवात करताना 50 किलो गटात व्हिएतनामच्या एनगुएनचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. निखतने सुरुवातीपासून आक्रमक खेळताना प्रतिस्पर्धी एनगुएनला जराही वरचढ होऊ दिले नाही व सहज विजय मिळवताना पुढील फेरी गाठली. याशिवाय, अन्य एका लढतीत 54 किलो गटात भारतच्या प्रीती पवारने 54 किलो गटात पुढील फेरीत प्रवेश केला आहे. तिने जॉर्डनच्या सिलिनाचा पराभव केला. तिची पुढील लढत कझाकच्या झायना शेकेरबेकोव्हाशी होईल तर झरीनाची पुढील लढत दक्षिण कोरियाच्या चोरेंग बॅकशी होईल.
टेटे : पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरीत, महिला पराभूत
टेबल टेनिसमध्ये भारताच्या पुरुष संघाने कझाकस्तानवर संघर्षपूर्ण विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांमध्ये निर्णायक सामन्यात मनिका बात्राला पराभव स्वीकारावा लागल्याने थायलंडकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. पुरुषांच्या लढतीत 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर अनुभवी शरथ कमलने शानदार खेळ करीत आयडोस केन्झीगुलोव्हवर 3-2 असा विजय मिळवित भारताला पुढील फेरी गाठून दिली.
सुमित नागल विजयी
टेनिसमध्ये साकेत मायनेनी व रामनाथन रामकुमार यांनी पुरुष दुहेरीत उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना नेपाळच्या बस्तोला अभिषेक व खाडका प्रदीप यांच्यावर विजय मिळविला. एकेरीत सुमित नागलने मकाव चीनच्या हो तिन मार्कोचा 6-0, 6-0 असा धुव्वा उडविला. त्याची पुढील लढत कझाकच्या बेबिट झुकायेव्ह किंवा ताजिकच्या मुखिडिनोव्ह यापैकी एकाशी होईल.
पुरुष व्हॉलीबॉलमध्ये भारताची स्वप्नवत घोडदौड जपानने रोखली. साखळी फेरीतील लढतीत भारताला जपानने 3-0 असे एकतर्फी पराभूत केले. आता पाचव्या-सहाव्या स्थानासाठी भारताची लढत पाकिस्तान किंवा कतारशी होईल.
रविवारी भारताने मिळवलेली पदके
- 10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग) – रौप्य
- पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग) – रौप्य
- पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोइंग) – कांस्य
- पुरुष कॉक्स 8 संघ (रोइंग) – रौप्य
- महिला 10 मीटर एअर रायफल (शूटिंग) – कांस्य