कास / वार्ताहर :
जागतिक वारसा स्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलांच्या रंग छटा बहरण्यास प्रारंभ झाला असून नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांची उधळण सप्टेंबर महीन्यात पाहायला मिळणार आहे. फुलांचा हंगामा पार पाडण्यासाठी वनसमिती सज्ज झाली आहे. 3 सप्टेंबर पासून हंगामाला शुभारंभ केला जाणार असून, सुरवातीचे काही दिवस ऑफलाईन प्रवेश दिला जाणार आहे. फुलांची परिस्थिती पाहून नंतर ऑनलाईनही प्रवेश सुरु करण्यात येणार आहेत.
गेल्या आठ दहा दिवसांपासून परिसरातील पावासाचे प्रमाण कमी झाले असून ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. अधुन मधुन श्रावण सरी कोसळत असल्याने फुलांच्या वनस्पती उमलण्यास पोषक वातावरण निर्माण झाले असुन, विविध फुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ झाला आहे. सद्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी, सोनकी, तेरडा, गेंद, टुथब्रश, निलिमा, आदी विविध जाती प्रजातीच्या फुलांच्या रंगीबेरंगी कळ्या दिसू लागल्या आहेत. ऊन पावसाचा खेळ असाच सुरु राहील्यास येत्या आठ-दहा दिवासांत विविधरंगी फुलांचा मोठ्या प्रमाणात बहर येऊन गालीचे पहायला मिळतील अशी वातावरण निर्मिती झाली असून पर्यटकांसाठी फुलांचा हंगामा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून तिन सप्टेबरला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हंगामास प्रारंभ केला जाणार आहे.
कास पठार कार्यकारी समिती मार्फत सद्यस्थितीत पठारावर असणारे मंडप गुहा, बदारतळ, कास तलाव व्ह्यू पॉइंट या तीन पाॅइंटला पर्यटकांना पन्नास रुपये शुल्क आकारून प्रवेश दिला जात आहे. लोखंडी जाळी यावर्षी उन्हाळ्यात काढण्यात आली. परंतु पर्यटक फुलांच्या क्षेत्रात कसेही प्रवेश करत असल्याने सद्या पठारावर समितीच्या वतीने फुलांच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी तात्पुरती तंगूसाची जाळी बसवण्यात आली आहे १२० हुन अधीक सुरक्षा रक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. कास परिसरात सद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके, रिमझीम पाऊस व अंगाला झोंबणारा गार वारा असं मस्त अल्हादायक वातावरण आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची रेलचेल वाढली असून पर्यटक पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत.