पुढच्या वर्षी सोने 64 हजारांवर जाण्याची शक्यता : विश्लेषकांचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बुधवारी सोन्याचा भाव 54,460 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर पोहचला. 28 महिन्यात प्रथमच असे घडले असल्याची माहिती आहे. यापूर्वी 10 ऑगस्ट 2020 रोजी सोने 55,515 रुपये होते. दुसऱया दिवशी म्हणजे 11 ऑगस्टला तो 53,951 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर सोन्याचा भाव प्रथमच 54,000 रुपयांच्या वर गेला. विश्लेषकांच्या मते ही तेजी 2023 मध्येही कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
वास्तविक देशात आणि जगात महागाई कमी होत आहे. त्यामुळे डॉलरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अशा वेळी सोने खरेदी करण्यासाठी अधिक डॉलर मोजावे लागतात. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) नुसार बुधवारी सोन्याचा (24 कॅरेट) भाव 54,462 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. या महिन्यात आता 1,342 रुपये सोने महागले आहे.
केवळ 2 आठवडय़ात 1,342 रुपयांनी वधारले
बाँड किंग जेफ्री गुंडलॅचने एका चिठ्ठीत लिहिले की, ‘सोन्याने या वर्षी चांगली कामगिरी केली आहे. सोन्याने या आठवडय़ात गेल्या 200 दिवसांपासून (1,821 प्रति औंस डॉलर) असलेली श्रेणी ओलांडली. त्यामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.’
2023 मध्ये 64,000 राहणार?
केडिया ऍडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की, 2023 मध्ये सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. आयआयएफएलचे उपाध्यक्ष (संशोधन) अनुज गुप्ता यांनी अंदाज व्यक्त केला आहे की 2022 च्या अखेरीस सोने 56,000 रुपयांपर्यंत पोहोचेल.