बेकायदेशीर फोन टॅपिंगसह मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) माजी अध्यक्ष रवी नारायण यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि को-लोकेशन घोटाळय़ाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी त्यांना फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्यांनी तपास यंत्रणांचा आदेश न पाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ते तपासात सहकार्य करत नसल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे. रवी नारायण यांच्यावर 14 जुलै 2022 रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंगच्या कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला होता.
नारायण यांनी 1993 ते 2014 पर्यंत ‘एनएसई’मध्ये अनेक पदे भूषवली. याच प्रकरणात ईडीने यापूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली होती. याप्रकरणी एनएसई प्रमुख चित्रा रामकृष्णन यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्या सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहेत. ईडीने सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे संबंधितांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी ईडीने आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचे अधिकारी आणि संचालक आनंद नारायण, अरमान पांडे, मनीष मित्तल, तत्कालीन वरि÷ माहिती सुरक्षा विश्लेषक नमन चतुर्वेदी, एनएसईचे कार्यकारी उपाध्यक्ष रवी वाराणसी, कॅम्पस प्रमुख महेश हळदीपूर आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
गृह मंत्रालयाने एनएसई कर्मचाऱयांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याबद्दल बोलले होते. एनएसईच्या उच्च पदांवर बसलेल्या अधिकाऱयांनी 2009 ते 2017 दरम्यान खासगी कंपनीच्या सहकार्याने हे फोन टॅपिंग केले होते. सायबर स्पेसमधील असुरक्षा शोधण्याच्या नावाखाली एका अभ्यासाच्या नावाखाली खासगी कंपनीने हे फोन टॅप केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. यासाठी एनएसईच्या अधिकाऱयांनी जारी केलेला करार खासगी कंपनीच्या बाजूने होता. या फोन टॅपिंगपूर्वी कंपनीने टेलिग्राफ कायद्यांतर्गत संबंधित अधिकाऱयांची मंजुरीही घेतली नसल्याचा आरोप आहे.