फोंडा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी नदी व परिवहनमंत्री शिवदास आत्माराम शेट वेरेकर (86) यांचे काल रविवार 11 रोजी सकाळी 8.30 वा. सिल्वानगर-फोंडा येथील राहत्या घरी निधन झाले. वेरेकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु होते. फोंडय़ातील काँग्रेस नेते व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार राजेश वेरेकर यांचे ते वडिल होत. त्यांच्या पश्चात पुत्र राजेश वेरेकर, रितेश वेरेकर तसेच विवाहित कन्या रिना संदीप परब, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.
शिवदास वेरेकर हे सन 1989 व 1994 असे दोनवेळा फोंडा मतदारसंघातून मगो पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. आमदारकीच्या दुसऱया कार्यकाळात माजी मुख्यमंत्री डॉ. विल्प्रेड डिसौजा यांच्या मंत्रीमंडळात काही काळ नदी व परिवहन मंत्रीपद त्यांनी भूषविले होते. प्रकृती कारणास्तव मागील साधारण वीस वर्षांपासून सक्रीय राजकारणातून ते बाजूला झाले होते.
सार्वजनिक जीवनात त्यांचा वावर कमी झाला असला तरी प्रोबोस क्लबच्या कार्याक्रमात ते आवर्जून उपस्थिती लावत. फोंडा येथील कार्यालयात लोकांना त्यांची अधूनमधून भेट होत असे. त्यांचे कुटुंब मूळ खांडेपार येथील असून व्यावसायानिमित्त बऱयाच वर्षांपासून ते फोंडय़ात स्थायिक झाले होते. फोंडा पालिकेचे नगरसेवक, नंतर दोनवेळा आमदार व मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास होता. फोंडय़ातील एक यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांचा लौकिक होता.
रविवारी सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता कळताच कृषीमंत्री व फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई, माजी आमदार मोहन आमशेकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, डॉ. केतन भाटीकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांच्यासह इतर नगरसेवक, कुर्टी खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच संदीप खांडेपारकर, माधव सहकारी तसेच अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर व असंख्य हितचिंतकांनी त्यांच्या सिल्वानगर येथील निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले. येथील वैश्य स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कनिष्ठ पुत्र रितेश वेरेकर यांनी त्यांच्या चितेला मंत्राग्नी दिला.
शिवदास वेरेकर व आपण विधानसभेत काही काळ सोबत होतो. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी केलेली लोकसेवा कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी भावना कृषीमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केली.
मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व लोकांना मदतीचा हात देणारे शिवदास वेरेकर यांची उणिव कायम जाणवणार आहे.