फ्रान्सचा 2-1 गोलफरकाने विजय, मोरोक्कोशी उपांत्य लढत
वृत्तसंस्था/ अल खोर, कतार
कीलियन एम्बापे व फ्रान्स यांनी सलग दुसऱयांदा विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून येथे झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत फ्रान्सने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. फ्रान्सची उपांत्य लढत पोर्तुगालला हरविणाऱया मोरोक्कोविरुद्ध बुधवारी होणार आहे.
अल बायत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑलिव्हिएर गिरोडने 78 व्या मिनिटाला फ्रान्सचा विजयी गोल नोंदवला. मागील स्पर्धा फ्रान्सने जिंकली असल्याने ते सलग दुसऱयांदा स्पर्धा जिंकण्याच्या मार्गावर आहेत. 1962 मध्ये ब्राझीलने सलग दुसऱयांदा जेतेपद मिळविण्याचा पराक्रम केला होता. त्यांचे अनुकरण करण्याची संधी फ्रान्सला प्राप्त झाली आहे. ब्राझीलच्या दोन्ही विजेत्या संघात पेले यांचा समावेश होता. तशीच संधी फ्रान्सच्या एम्बापेला मिळाली आहे.
78 व्या मिनिटाला इंग्लंडचा डिफेंडर हरी मॅग्वायरकडून डिफ्लेक्ट झालेल्या चेंडूवर गिरोडने मारलेला हेडर इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डला भेदत जाळय़ात गेल्यानंतर गिरोडने जोरदार सेलेब्रेशन केले. 84 व्या मिनिटाला इंग्लंडचा स्ट्रायकर हॅरी केनला बरोबरी साधण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. पण पेनल्टी घेण्यात कधीही चूक न करणाऱया केनकडून पेनल्टी हुकली आणि ही संधी वाया गेल्याने तिथेच इंग्लंडचा पराभव निश्चित झाला. केनने मारलेला पेनल्टी फटका गोलपोस्टच्या बारवरून बाहेर गेला. या सामन्यात त्याला मिळालेली ही दुसरी पेनल्टी होती.
त्याआधी मिळालेल्या पहिल्या पेनल्टीवर हॅरी केनने अचूक गोल नोंदवून इंग्लंडला फ्रान्सशी 1-1 अशी बरोबरी साधून दिली होती. पेनल्टी क्षेत्रात बुकायो साकाला चौमेनीने खाली पाडल्यामुळे इंग्लंडला ही पेनल्टी मिळाली होती. केनचा हा इंग्लंडतर्फे नोंदवलेला 53 वा गोल असून देशातर्फे सर्वाधिक गोल नोंदवणाऱया वेन रूनीशी त्याने बरोबरी केली आहे. ऑर्लियन चौमेनीने पूर्वार्धात 17 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली होती. 20 मीटर्सवरून त्याने पॉवरफुल फटक्यावर हा गोल नोंदवला होता.
1-1 अशा बरोबरीनंतर इंग्लंडच आणखी गोल नोंदवणार असे त्यांच्या खेळावरून वाटत होते. पण त्याऐवजी गिरोडने फ्रान्सचा गोल नोंदवला. अँन्टॉइन ग्रीझमनकडून आलेल्या क्रॉसवर त्याने हा गोल नोंदवला. फ्रान्सतर्फे नोंदवलेला त्याचा हा विक्रम वाढविणारा 53 वा आंतरराष्ट्रीय गोल आहे. पण फ्रान्सचा हा आनंद फार काळ टिकला नाही. फ्रान्सच्या थिओ हर्नांडेझने बदली खेळाडू मॅसन माऊंटवर बॉक्स क्षेत्रात फाऊल केल्याने रेफ्री विल्टन सॅम्पिओ यांनी इंग्लंडला पेनल्टी बहाल केली. पण पहिल्या पेनल्टीवेळी गोलरक्षक हय़ुगो लॉरिसला चकवा देण्यात यशस्वी ठरलेल्या हॅरी केनने यावेळी मात्र उंच फटका मारल्याने चेंडू गोलबारवरून बाहेर गेल्याने ही संधी वाया गेली.
मागील वर्षीच्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडला इटलीकडून अंतिम फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता तर मागील विश्वचषक स्पर्धेत त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. कतारमधील स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेपर्यंत इंग्लंडने 12 गोल नोंदवले होते. पण विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच ते पिछाडीवर पडले. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने इराणचा 6-2 असा धुव्वा उडविला होता. त्यावेळीही इंग्लंडने प्रतिस्पर्ध्याला गोल करू दिला होता. त्यानंतर गोल बहाल करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. फ्रान्सच्या एम्बापेला या सामन्यात गोल नोंदवता आला नाही. पण हॅरी केनची पेनल्टी हुकल्यानंतर त्याने तुफान जल्लोष केला. या स्पर्धेत 5 गोल नोंदवत तो आघाडीवर असून गिरोड व मेस्सी यांच्यापेक्षा एका गोलने तो पुढे आहे.
इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट मोठय़ा सामन्यात फार बचावात्मक धोरण अवलंबतात, अशी त्यांच्यावर टीका होत होती. पण या सामन्यात त्यांनी बॅकलाईनमध्ये चौघांना ठेवत आक्रमक धोरण अवलंबले. सुरुवातीलाच इंग्लंडच्या मॅग्वायरने प्रतिस्पर्धी खेळाडूकडून कोणताही दबाव नसताना जोरदार फटका मारला, तो मैदानाबाहेर गेला. चेंडूमधून हवा जात असल्याचे मॅग्वायरने रेफ्रींच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दुसरा नवा चेंडू घेतला गेला.
14 डिसेंबर रोजी अर्जेन्टिना व क्रोएशिया यांच्यात पहिला तर दुसरा उपांत्य सामना 15 रोजी फ्रान्स व मोरोक्को यांच्यात होणार आहे. 17 रोजी तिसऱया क्रमांकाचा सामना तर जेतेपदाची लढत 18 डिसेंबरला होणार आहे.