जून्या काळातील एक संघर्षशील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव दाजीबा ढाकणे यांचे अहमदनगर येथील एका खाजगी रूग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते ८७ वर्षांचे होते. पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) या त्यांच्या मुळगावी शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बबनराव ढाकणे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एका खाजगी रूग्णालयात उपचार चालू होते. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाला होता. पण रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे मुलगा प्रताप ढाकणे, सून व नातवंडे असा परिवार आहे.
१० नोव्हेंबर १९३७ मध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात बबनराव ढाकणे यांचा जन्म झाला. ते विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात ओढले गेले. आपल्या तालुक्यातील समस्याबाबत त्यांनी थेट दिल्ली येथे जाऊन तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करताना विधीमंडळाच्या गॅलरीतून कागदपत्रे भिरकावून घोषणा दिल्या होत्या. गोवा मुक्ती संग्रामातही ते सक्रिय होते.
बबनराव ढाकणे हे राजकिय वर्तुळात एक संघर्षशील नेता म्हणून ओळखले जात. त्यांनी दुष्काळग्रस्त पाथर्डी तालुक्याच्या प्रश्नांची मांडणी जोरदारपणे सरकारपुढे मांडली. उसतोड कामगार यांच्याबरोबच समाजातील कष्टकरी लोकांच्या अडचणींची त्यांना चांगली जाण होती. सक्रिय राजकारणात पडल्यावर महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्फे ते लोकसभेवर ते निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्रालयाचा कारभारही सांभाळला. त्यांच्या जीवन कार्यावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ हे गेल्यावर्षीच पुस्तक प्रकाशित झाले.