वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आपल्या आयुष्यातील अखेरचा काळ कुटुंबातील सदस्यांमध्येच घालवण्यासाठी आता त्यांना रुग्णालयातून घरी हलवण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये आता त्यांच्यावर घरीच उपचार केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
98 वषीय जिमी कार्टर हे सद्यस्थितीत अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. ते 1977 ते 1981 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. 2002 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला होता. कार्टर हे काही काळापासून मेलेनोमा नावाच्या आजाराने त्रस्त होते. मेलेनोमा हा त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार असून तो आता त्यांच्या यकृत आणि मेंदूमध्ये पसरला आहे.
जानेवारी 1978 मध्ये जिमी कार्टर तीन दिवसांच्या दौऱयावर भारतात आले होते. भारताला भेट देणारे ते अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्ध आणि 1974 मधील भारताच्या अणुचाचण्यांनंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव जिमी कार्टर यांच्या भेटीमुळे कमी झाला होता.