गेले काही दिवस बेपत्ता असणारी सुप्रसिद्ध युटय़ूबर ‘बिंदास काव्या’ अखेर सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी तसेच हजारोंच्या संख्येने असलेल्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी कोणालाही न सांगता घर सोडले होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचा शोध सुरू होता. सोशल मीडियावरून त्यांच्यासंबंधी चिंता व्यक्त होत होती.
कुटुंबीयांवर नाराज झाल्याने आपण लखनौला जात होतो, असे काव्या यांनी नंतर स्पष्टीकरण दिले आहे. तथापि त्या पोलिसांना इटारसी येथे सापडल्याने त्यांच्या पळून जाण्याचे गूढ काही प्रमाणात अद्यापही टिकून आहे. ही यूटय़ुबर बिहारमधील औरंगाबाद येथे वास्तव्यास असून अवघी 16 वर्षांची आहे. अद्याप कायदेशीरदृष्टय़ा ती अल्पवयीन असल्याने तिच्या पलायनासंबंधी विशेष चिंता व्यक्त करण्यात येत होती. तिचे अपहरण करण्यात आले असावे, असेही अनुमान काढण्यात आले होते. पोलीस त्यादृष्टीने तपास करीत होते. काव्य़ाचे स्वतःचे युटय़ूब चॅनेल असून त्याच्यावर ती ब्लॉग चालविते. तिच्या चॅनेलचे 1 कोटी 30 लाख वर्गणीदार आहेत. तिने 2017 मध्ये आपली युटय़ूब चॅनेल सुरू केले होते. त्यावेळी ती अवघी 11 वर्षांची होती. अल्पावधीतच हे चॅनेल प्रचंड लोकप्रिय झाले.