पंचवीस तोळे सोने व रोकड; सुमारे पंधरा लाखाचा ऐवज लंपास
गारगोटी प्रतिनिधी
गारगोटी येथील श्री कॉलनी व अवधूत कॉलनीतील चार बंद घरांना चोरट्यानी लक्ष्य केले असून बंद घराचे कडी कोयंडे तोडून सुमारे 25 तोळे सोन्याचे दागिने, पावणेतीन लाख रुपयांची रोख रक्कम व कॅमेरा असा सुमारे पंधरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे.
गारगोटीतील श्री कॉलनीतील तीन मुस्लिम कुटुंबीय बकरी ईद सनानिमित्त गावी गेले होते.याचाच लाभ चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घेतला,शमसूद्दीन चांदसाब काझी यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात चोरट्यांनी प्रवेश केला. बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅग तोडून बॅगेतील सहा चेन, गंठण, लहान मुलांच्या अंगठ्या, झुमके असं सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिनं चोरट्यानी लंपास केले.
तब्बसुम शब्बीर पन्हाळकर यांच्या घरात चार चाकी गाडी खरेदीसाठी ठेवलेली दोन लाख रुपयाची रोकड, तीन अंगठ्या, कानातले झुमके असे सुमारे सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. याच घरात दुसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या आशिया अब्दुलमज्जिद मुल्ला यांच्या घरातील साठहजार रुपयांची रोकड घंटन, अंगठी असे सुमारे पाच तोळ्याचे दागिने लंपास केले. यानंतर चोरट्यांनी अवधूत कॉलनीतील महेंद्र नलवडे हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते त्यांच्या घरातील दहा हजार रुपयाची रोकड व कॅमेरा अज्ञात चोरटयांनी लंपास केला. एकाच रात्री चार घर फोड्या करून सुमारे पंधरा लाख रुपयांचे सोने रोख रक्कम असा ऐवज लंपास केले आहे पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले होते.या घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे.