झुआरी नगरातील घटना : गवताला लागलेली आग इतरत्र पसरली
वार्ताहर /झुआरीनगर
झुआरीनगरातील पोलीस चौकीसमोर गवताला लागलेली आग इतरत्र पसरून जवळच पार्क केलेल्या चार चाकी गाड्यांनी पेट घेतला. या गाड्या जळून खाक झाल्या तर एक कार अर्धवट जळालेल्या अवस्थेत वाचवण्यात यश आले. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. झुआरीनगरातील मुख्य नाक्यावरील पोलीस चौकीसमोरील खुल्या जागेत नियमीतपणे वाहने पार्क करण्यात येतात. काल रविवारीही त्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात आली होती. त्या ठिकाणी असलेल्या सुक्या गवताला अचानक आग लागली. आसपास गवत असल्याने आग वाहनांपर्यंत पोचली व चार चाकी गाड्यांनी पेट घेतला. काहींनी त्या ठिकाणी धाव घेऊन ती वाहने बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न निष्फळ ठरले. चारही कार पूर्ण खांक झाल्या. तर अर्धवट जाळालेली एक कार वाचविण्यात यश आले. जवळच असलेल्या झुआरी कंपनीच्या अग्निशामक बंबांसह वेर्णा व वास्कोतील शासकीय अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन ही आग विझविण्याची करण्याची कामगिरी पार पाडली.