1 कोटींच्या ‘सीसीआर’ फंडातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याचे नियोजन
सर्वसामान्य रूग्णांना दिलासा, सीपीआरमधील ताणही होणार कमी
कोल्हापूर/विनोद सावंत
महापालिका प्रशासनाकडून आयसोलेशन हॉस्पिटल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘सीएसआर’ फंडातून येथे पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. नॅशनल हेल्थ मिशनमार्फत ऑपरेशनावरील खर्च महापालिकेला मिळणार आहे. तामुळे रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. एका कंपनीने आयसोलेशन हॉस्पिटलला भेट दिली असून त्यांनी 1 कोटींचा सीएसआर फंड देण्याची तयारी दर्शवली आहे.
कोल्हापूर महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून मिळणाऱ्या उत्पन्न खर्च वजा करून विकासकामे करते. कोल्हापूर महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती बेताची आहे. तरी देखील केएमटी सेवेसह आरोग्य सेवाही दिली जात आहे. महापालिकेची शहरात सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल आणि पंचगंगा हॉस्पिटलसह 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ही सर्वसामान्य रूग्णांना आधारवड ठरत आहेत. कोरोनामध्ये महापालिकेच्या 11 कोरोना सेंटरमध्ये 11 हजार रूग्णांवर मोफत उपचार केले होते. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागावरील ताण कमी झाला होता.
कोरोनामध्ये आयसोलेशन हॉस्पिटलचे विस्तारीकरण करण्यात आले. येथे आणखीन एक इमारतीची उभारणी केली. सध्या कोरोनाची साथ नियंत्रणात आहे. त्यामुळे या इमारतीचा वापर होत नाही. ही जागा वापरात यावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या संकल्पनेतून येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे महापालिकेला यासाठी काहीही खर्च येणार नाही. अतिरिक्त आयुक्त जाधव यांनी सीएसआर फंडातून मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मशिनरी खरेदीसह सिव्हील वर्क करण्यासाठी नियोजन केले आहे. नॅशनल हेल्थ मिशनकडून स्टाफही नियुक्त केला जाणार आहे.
सध्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू रूग्णांवर शस्त्रक्रिया केली जात नाही. प्रथमच हा विभाग मनपा सुरू करत आहे. सीपीआरमध्ये मोतीबिंदू रूग्णांवर शस्त्रक्रिया होते. परंतु तेथे रूग्णांची गर्दी असते. यामुळे काहीवेळेस रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी वेटींग करावे लागते. हाच विचार करून महापालिकेने मनपाच्या हॉस्पिटलमध्येही मोतीबिंदूवर मोफत उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील सर्व रूग्णांना होणार फायदा
महापालिकेच्या रूग्णालयामध्ये शहरासह ग्रामिण भागातील रूग्ण उपचार घेतात. आयासोलेशनमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर याचा लाभ केवळ शहरातील रूग्णांना नव्हे तर जिल्ह्यातील सर्व रूग्णांना होणार आहे.
मोफत शस्त्रक्रियेमुळे हजारो रूपयांचा खर्च वाचणार
खासगी हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी हजारो रूपये खर्च होतो. सर्वसामान्यांना हा खर्च आवक्याबाहेर असतो. याचाच विचार करून महापालिकेने आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याचे नियोजन केले आहे. हा विभाग सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य रूग्णांसाठी आधार ठरणार आहे.