वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे पेग फुल्टॉन यांची नियुक्ती केल्याची घोषणा हॉकी इंडियाने शुक्रवारी केली. भारतीय हॉकी संघाला आता फुल्टॉन हे नवे प्रशिक्षक लाभले आहेत.
अलीकडेच भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय हॉकी संघाची कामगिरी अत्यंत नित्कृष्ट झाल्याने तत्कालीन प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहॅम रिड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचप्रमाणे भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षक वर्गातील अन्य सदस्य ग्रेग क्लार्क तसेच सल्लागार मिचेल पेम्बरटन यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक ग्रॅहॅम रिड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक मिळविले होते.
दक्षिण आफ्रिकेने पेग फुल्टॉन यांना जवळपास 25 वर्षांचा हॉकी प्रशिक्षणाचा अनुभव आहे. 2014 ते 2018 या कालावधीत फुल्टॉन हे आयरिश पुरुष हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयरिश हॉकी संघाने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. शंभर वर्षांच्या कालावधीत आयरिश हॉकी संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. पेग फुल्टॉन यांची 2015 साली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनतर्फे सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. फुल्टॉन यापूर्वी विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियम हॉकी संघाचे साहाय्यक प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बेल्जियमने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. भारतीय पुरुष हॉकी संघासाठी आपली प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याबद्दल फुल्टॉन यांनी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांचे आभार मानले आहेत. पुढील महिन्यात राऊरकेला येथे होणाऱया ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीविरुद्धच्या हॉकी प्रो लीग सामन्यावेळी फुल्टॉन आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. भारत आणि जर्मनी यांच्यातील पहिला सामना 10 मार्चला तर उभय संघातील परतीचा सामना 13 मार्चला होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना 12 तर दुसरा सामना 15 मार्चला खेळविला जाईल. हॉकी इंडियाने यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड जॉन व बी. जे. करियप्पा यांची हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती.