हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी बजेट मध्ये निधीची तरतूद
राधानगरी प्रतिनिधी
राधानगरी येथे असणारी तहसील कार्यालयाची इमारत ही जिर्ण झाल्यामुळे अधिकारी व नागरीकांची गैरसोय होत होती. तसेच नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सुविधा मिळाव्यात याकरिता राधानगरी येथे नवीन सुसज्ज तहसील कार्यालय बांधणे गरजेचे होते. याकरिता शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून तहसील कार्यालय बांधकामासाठी 14 कोटी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राधानगरी तालुक्यातील महसुली कामकाज गेले एक तप संस्थानकालीन इमारतीमध्ये सुरू होते. याठिकाणी अद्ययावत इमारती नसल्याने शासनाचा प्रमुख व अविभाज्य घटक मानल्या जाणाऱ्या महसूल विभागाचा कारभार जुन्या इमारतीमध्ये अपुऱ्या जागेमध्ये सुरू होता. तसेच येथे तहसील कार्यालय व इतर सर्व विभाग एकत्रितपणे जुन्या इमारतीतच कार्यरत होते. सदरची इमारत ही जिर्ण झाल्यामुळे अधिकारी व नागरीकांची गैरसोय होत होती. यामुळे सदर ठिकाणी नवीन व सुसज्ज इमारत बांधणे गरजेचे होते. या बाबतचा प्रस्ताव बांधकाम विभाग यांचे मार्फत विहित नमुना व अंदाजपत्रकासह मुख्य अभियंता पुणे यांची तांत्रिक मान्यता घेऊन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे कार्यालयाकडून विभागीय आयुक पुणे यांचेमार्फत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास महसूल व वन विभागाच्या दि.16 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रशासकिय मान्यता देण्यात आली असून हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी बजेटमध्ये 14 कोटी 57 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या महसूल प्रशासनाच्या नावे असणाऱ्या जागेतच जुनी इमारत निर्लेखन करून त्याच ठिकाणी अद्ययावत प्रशस्त इमारत उभारली जाणार आहे.
याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सहकार्य लाभले असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.