‘अमृत योजना-2’ अंतर्गत 25 कोटी 10 लाख निधीसाठी शासनाकडे मागणी
बेळगाव : महापालिका व्याप्तीमधील तलावांच्या विकासासाठी अमृत योजनेंतर्गत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. तलाव पुनरुज्जीवन आणि उद्यानांच्या विकासासाठी 25 कोटी 10 लाखाच्या निधीचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. 20 कोटी अनुदानातून तलावांचा विकास आणि 5 कोटीमधून विविध उद्यानांचा विकास करण्याचा आराखडा तयार केला असून शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 1 हजार कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला विशेष अनुदान मंजूर करण्यात आले नाही. महात्मा गांधी शहर विकास अनुदानातून 125 कोटी अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर कोणतेच विशेष अनुदान महापालिकेला मंजूर झाले नाही. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने निधी मंजूर केला होता. मात्र या निधीचा विनियोग स्मार्ट सिटी कंपनीमार्फत करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेला निधीची अडचण भासत आहे. मालमत्ता कर, 15 वा वित्त आयोग अनुदान उपलब्ध आहे. एसएफसी अनुदानाची रक्कमदेखील कमी झाली असून मिळणाऱ्या निधीचा विनियोग स्वच्छता कामासाठी वापरला जात आहे. त्यामुळे विशेष योजना राबविण्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नाही. त्याकरिता महापालिकेमार्फत शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शहरातील 6 तलावांच्या पुनऊज्जीवनाचा प्रस्ताव असून तलावांचा विकास करण्यासाठी 20 कोटीच्या अनुदानाचा आराखडा तयार केला आहे. तसेच शहर आणि उपनगरातील 12 उद्यानांच्या विकासासाठी 5 कोटी 10 लाखाच्या निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तलाव आणि उद्यानांच्या विकासासाठी ‘अमृत योजना-2’ मधून 25 कोटी 10 लाखाचा निधी मंजूर करावा, असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर तलावाचे पुनऊज्जीवन आणि उद्यानांचा विकास होणार आहे.
विविध तलावांच्या पुनऊज्जीवनासाठी करण्यात आलेल्या निधीची तरतूद
तलावाचे नाव निधी
- काळा तलाव 8 कोटी 50 लाख
- रामतीर्थ तलाव 3 कोटी
- ब्रम्हलिंग तलाव 2 कोटी 50 लाख
- सोमगेरे तलाव 2 कोटी 50 लाख
- बसवण कुडची तलाव 1 कोटी 75 लाख
- हरिजन तलाव 1 कोटी 75 लाख
- एकूण 20 कोटी
उद्यानांच्या विकासासाठी करण्यात आलेली निधीची तरतूद
उद्यानांचे नाव निधी
- छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व महात्मा गांधी उद्यान 50 लाख
- सीटी ले लाईन गार्डन 20 लाख
- बसवेश्वर उद्यान, गोवावेस 40 लाख
- गणेश गार्डन, हिंदवाडी 20 लाख
- नित्यानंद कॉलनी उद्यान 15 लाख
- महांतेश उद्यान, अनगोळ 15 लाख
- विनायकनगर उद्यान 20 लाख
- आझाद हौसिंग सोसायटी उद्यान 10 लाख
- बसव कॉलनी उद्यान,
- बॉक्साईट रोड 15 लाख
- अन्नपूर्णावाडी उद्यान, भारत सोसायटी 15 लाख
- प्रगती उद्यान 40 लाख
- मालिनीनगर उद्यान 2 कोटी 50 लाख
- एकूण 5 कोटी 10 लाख
हिडकल धरणात पिण्याच्या पाण्यासाठी आणखी एक टीएमसी पाणीसाठा
उन्हाळ्यात बागलकोट, मुधोळ, बेळगाव शहर व जिल्ह्यातील काही भागांची तहान भागविण्यासाठी हिडकल धरणात आणखी एक टीएमसी अतिरिक्त पाणी राखून ठेवण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारने अनुमोदन दिले आहे. आता पिण्यासाठी या धरणात पाच टीएमसी पाणी राखून ठेवण्यात येणार आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार पिण्यासाठी 4 टीएमसी राखून ठेवण्याचा निर्णय झाला होता. आता बागलकोट, मुधोळ, बेळगाव शहर आदी भागांची परिस्थिती लक्षात घेऊन पिण्यासाठी आणखी एक टीएमसी अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय पाणी धोरणानुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर हिडकल धरणात 4 टीएमसीऐवजी 5 टीएमसी पाणी राखून ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची सूचना सरकारने अधिकाऱ्यांना केली आहे. 14 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या घटप्रभा पाटबंधारे योजना सल्लागार समितीच्या बैठकीत एप्रिल, मे महिन्यांसाठी 4 टीएमसी पाणी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता बागलकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार आणखी एक टीएमसी पाणी राखून ठेवण्यात येणार आहे.