50 सेंट्रिंग प्लेट, चोरलेला दारूसाठा जप्त : 6 जणांना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
चोरीप्रकरणी सहा जणांच्या एका टोळीला मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बळ्ळारी नाला कामावरील सेंट्रिंग प्लेट, चचडी क्रॉस येथे एमएसआयएलचे दारू दुकान फोडण्याबरोबरच वेगवेगळे गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
उमेश भीमाप्पा गोल्लर (वय 34), चंद्रू देमाप्पा गोल्लर (वय 25) दोघेही राहणार बैलहोंगल, अल्लू जंबण्णा दुर्गमुर्गी (वय 20), सुरेश बाबू दुर्गमुर्गी (वय 27), हणमंत मऱ्याप्पा मादर (वय 21) सर्व राहणार यरगट्टी व दावलसाब हजरतसाब दोडमनी (वय 28) रा. ब्याहट्टी, ता. हुबळी अशी अटक केलेल्या सहा जणांची नावे आहेत.
मुरगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील यरझरवीजवळ बळ्ळारी नाल्यासाठीच्या 50 सेंट्रिंग प्लेट चोरण्यात आल्या होत्या. चचडी
क्रॉसजवळ असलेल्या एमएसआयएल दारू दुकानाची पाठीमागची भिंत फोडून 1 लाख 31 हजार 753 रुपये किमतीचा दारूसाठा व 53 हजार 980 रुपयांची रोख रक्कम लांबविण्यात आली होती. याच टोळीने हे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
यरगट्टी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. या गुन्ह्याची कबुलीही संशयितांनी दिली आहे. रामदुर्ग पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील व पोलीस उपनिरीक्षक आय. एम. हिरेगौडर, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली, लक्ष्मी बिरादार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याजवळून दीड लाख रुपये किमतीच्या 50 सेंट्रिंग प्लेट, 19 हजार 500 रुपये रोख रक्कम व सुमारे तीन लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप जप्त करण्यात आली आहे.