आरोग्य विभागाकडून लवकरच मोहीम : व्यावसायिकांचा शोध घेण्याचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विनापरवाना व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. व्यवसाय परवाना नुतनीकरण आणि नवीन व्यवसाय परवाना घेण्याचे आवाहन महापालिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. तरीदेखील व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मनपाच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
यापूर्वी व्यवसाय परवाना आणि प्लास्टिक बंदी कारवाई आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकांकरवी करण्यात येत होती. मात्र अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी मागील महिन्याभरापासून ही कारवाई थंडावली होती. प्लास्टिक बंदी असूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्याचप्रमाणे विनापरवाना व्यावसायिकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्यासाठी परवान्याची तपासणी करण्यात येत होती.
अनेक व्यावसायिकांना नोटिसा बजावून व्यवसाय परवाना घेण्याची सूचना करण्यात आली होती. यापैकी काही व्यावसायिकांनी परवाने घेतले. मात्र बहुतांश व्यावसायिकांनी याकडे कानाडोळा केला आहे. 1 ते 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी व्यवसाय परवाने एकाचवेळी दिले जात आहेत. याकरिता व्यावसायिकांचा प्रतिसाद चांगला आहे. आतापर्यंत 2000 व्यावसायिकांनी परवाने घेतले आहेत. व्यवसाय परवाना शुल्काच्या माध्यमातून आरोग्य विभागाने 1 कोटी महसूल जमा केला आहे. मात्र अनेक व्यावसायिकांनी परवाना घेण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
पुढील आठवड्यापासून ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक व्यावसायिकांकडे परवान्याची विचारणा केली जाणार आहे. व्यवसाय परवाना नसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांनी दिली. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकांनी महापालिका कार्यालयात संपर्क साधून किंवा महापालिकेच्या संकेतस्थळावरील ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून व्यवसाय परवाना घ्यावा, असे आवाहन केले आहे.