सर्व पैसा ‘नमामि गंगे’ अभियानासाठी देणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशातील आणि जगभरातील विविध मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार असून या लिलावातून मिळालेली रक्कम ‘नमामि गंगे’ या गंगा स्वच्छता अभियानाला दिली जाणार आहे. हा लिवाव 17 सप्टेंबरपासून सुरु होणार असून 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींना विविध क्षेत्रांमधील मान्यवर आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे खेळाडू यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात भेटवस्तू मिळालेल्या आहेत. अशा 1,200 हून अधिक वस्तूंचा लिलाव होणार आहे. ही माहिती नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या संस्थेचे महासंचालक अद्वैत गणनायक यांनी दिली.
ऑनलाईन प्रक्रिया
पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंची सूची बनविण्याचे कार्य पार पडले असून 17 सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव करण्यात येईल. खरेदीदार त्यांनी निवडलेल्या वस्तूंवर बोली लावू शकतील. लिलाव होणाऱया वस्तूंची किंमत 100 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत असू शकेल. या वस्तूंमध्ये राणी कमलापतीची मूर्ती, एक हनुमान मूर्ती, खेळाडूंनी दिलेली खेळण्याची साधने, सूर्याचे एक पेंटिंग, त्रिशूळ आदी अनेक वस्तू लिलावाच्या सूचीत आहेत.
वाढदिवशी लिलाव
17 सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. त्यादिवशीपासून हा लिलाव होणार आहे. आतापर्यंत त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा तीनवेळा लिलाव झाला असून त्या लिलावांमधून मिळालेली सर्व रक्कम नमामि गंगे या अभियानाला देण्यात आली आहे. आताचा लिलाव हा चौथा असेल असे स्पष्ट करण्यात आले.