उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकांना बजावले मुख्यमंत्र्यांनी
प्रतिनिधी /पणजी
आपल्या रास्त मागणी साठी गेले 37 दिवस येथील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱया तसेच गेल्या सोळा दिवसांपासून बेमुदत उपोषण करणाऱया सात अंगणवाडी सेविकांची सरकार सतावणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यासाठी जे आंदोलन केले होते ती त्यांची चुक आहे तसेच यापुढे आंदोलन करणार नाही असे लेखी द्या, त्यानंतर तुम्हाला सेवेत घेतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपोषणकर्त्या आंगणवाडी सेविकांना बजावले.
काँग्रेसच्या सांगण्यावरून सेविकांनी आंदोलन केले होते असा अरोप भाजप सराकरकडून अंगणवाडी सेविकांवर केला असून सात सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. आपल्या हक्का साठी आंदोलन करणे गुन्हा आहे काय असा उलट प्रश्न उपस्थित करीत सेविकांनी लेखी देण्यास मनाई केली आहे.
गुरुवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांच्या मार्फत आझादमैदानावर आंदोलन करणाऱया सेविकांना बोलावणे पाठविले सेविकांनी भेटण्यास मनाई केली असतानाही पिंक फोर्सच्या गाडीत घालून त्यांना नेण्यात आले. सेवेत यायचे असेल तर सचिवकडे लेखी द्या की आंदोलन करणार नाही तसेच जे आंदोलन केले होते ती चुक होती. सेविकांनी लेखी देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान शुक्रवारी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी आझाद मैदानावरील उपोषणकर्त्यांची भेट घेतली. आपण मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवितो की अंगणवाडी सेविकांचे आंदोलन करून आणण्यास काँग्रेसचा हात नव्हता तसेच आंदोलन करण्यास काँग्रेसने त्यांना प्रवृत्त केले नव्हते. केवळ माणूसकीच्या नात्याने काँग्रेसने अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला सहकार्य केले होते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात राजकारण घुसडण्याचा प्रयत्न करू नका. आझाद मैदानावर उपोषण करणाऱया सेविकांना परत सेवेत घेण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे मायकल लोबो यांनी सांगितले.