छायाचित्रे काढून घेण्यासाठी पोहोचतात जगभरातून लोक
सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा असून कुणी कुठे फिरायला गेल्यास तेथील सुंदर छायाचित्रे इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर अपलोड न केल्यास ट्रिप अपूर्ण मानली जाते. अशा स्थितीत लोकांना छायाचित्रे सुंदर आणि मनपसंत येतील अशा लोकेशनचा शोध असतो.
काही ठिकाणे याप्रकरणी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहेत. कोरोना महामारीदरमयन अनेक ठिकाणं चर्चेत आली आहेत. अशाच ठिकाणांपैकी एक आहे जपानमधील चिचिबुगाहामा बीच आहे. पूर्वी हे बीच फारसे प्रसिद्ध नव्हते, परंतु बीचवर काढण्यात आलेल्या छायाचित्रांनी याला सोशल मीडियावर प्रसिद्ध करून सोडले आहे.
मिरर बीच
चिचिबुगाहामा बीच जपानच्या मिटोयो शहरात आहे. या ठिकाणाची लोकांना पूर्वी फारशी माहिती नव्हती. परंतु इन्स्टाग्रामवर या बीचच्या सुंदर छायाचित्रांनी लोकांदरम्यान याला विशेष प्रसिद्ध केले आहे. जपानच्या कागावा येथे असलेल्या या बीचबद्दल 2016 मध्ये लोकांना कळण्यास सुरुवात झाली. तेव्हा तेथे एक छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान काढण्यात आलेल्या छायाचित्रांनी लोकांनी लक्ष या ठिकाणाकडे वेधून घेतले. येथे मिरर इफेक्ट देणाऱया छायाचित्रांनी पर्यटकांना आकर्षित केले आहे.
वाढली पर्यटकांची संख्या
ही छायाचित्रे इंटरनेटवर लोकप्रिय होऊ लागल्यावर येथे लोकांचे येणे-जाणे देखील वाढले. आता तेथे 30-40 हजार पर्यटक पोहोचत आहेत. एका ट्रव्हल मॅगजीनने तर याला जपानचे सॉल्ट लेकच संबोधिले आहे. येथे येणारे बहुतांश लोक हे इन्स्टाग्रामर्स असतात, जे स्वतःसाठी उत्तम छायाचित्रे काढून घेतात.