450 लीटर दारूसाठय़ासह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त : अबकारी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
गोव्यामधून बेंगळूरकडे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱया वाहनाला अबकारी पोलिसांनी अडवून 460 लीटर दारूसाठा जप्त केला आहे. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कॅन्टरही जप्त करण्यात आला आहे. अबकारी पोलिसांनी कणकुंबी (ता. खानापूर) जवळ ही कारवाई केली आहे.
गोव्यामधून पहाटे वाहन क्र. केए 02 सी 0667 यामधून दारू वाहतूक करण्यात येत होती. कणकुंबीजवळ पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. यावेळी गोवा बनावटीची दारू त्यामध्ये आढळून आली. 450 लीटर इतका दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी जयराम याला अटक करण्यात आली आहे.
अबकारी पोलीस अधिकारी आय. मंजुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सी. एस. पाटील, जयरामेगौडा, पूर्वा गडादी, विठ्ठल क्वॉरी, रामाप्पा मण्णिकेरी, गुंडुराव पुजारी, प्रवीण बेळकोड, एस. एस. पाटील यांनी भाग घेतला होता. आरोपीकडून 66 हजार रुपयांची दारू आणि 7 लाख 50 हजार रुपये किमतीचा कंटनेर असा एकूण 8 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.